
गेल्या आठवड्याच्या अखेरीस इस्लामाबादमध्ये झालेल्या २१ तासांच्या प्रदीर्घ शांतता चर्चेत अमेरिका आणि इराण यांच्यात कोणताही करार होऊ शकला नाही. तेहरानने अणुइंधनाच्या संवर्धनावरील आपला अधिकार सोडण्यास नकार दिला, असा दावा वॉशिंग्टनने केला आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स म्हणाले, “मी असे म्हणणार नाही की सर्व काही बिघडले आहे. मला असे वाटते की, काही गोष्टी योग्य दिशेनेही गेल्या आहेत. आम्ही बरीच प्रगती केली आहे,” असे व्हान्स यांनी ‘फॉक्स न्यूज’ला सांगितले. व्हान्स म्हणाले की, अमेरिका आणि इराण हे दोन्ही देश एकत्र येण्याची पहिलीच वेळ होती. “त्यामुळे, मला वाटते की ही एक सकारात्मक बाब आहे, या वाटाघाटींमध्ये आम्ही काही प्रमाणात प्रगतीही साधली आहे,” असे ते म्हणाले.
याच मुद्द्यावर अधिक भाष्य करताना व्हान्स म्हणाले, इराणने आमच्या दिशेने पावले उचलली आहेत, म्हणूनच मला वाटते की आम्हाला काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत. परंतु अजूनही त्यांनी काही पावले पुढे येणे गरजेचे आहे.” असेही ते म्हणाले. अमेरिका आणि इराणच्या शांततेच्या चर्चेमध्ये व्हान्स यांनी अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. या शिष्टमंडळात विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनेर यांचाही समावेश होता. पीटीआय ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या शिष्टमंडळात संसदेचे सभापती मोहम्मद बागेर गालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश होता.
व्हान्स यांनी यावर जोर दिला की, जर इराणने अणुमहत्वाकांक्षेबाबत अमेरिकेने आखून दिलेल्या मर्यादा पूर्ण केल्या गेल्या, तर हा शांतता करार दोन्ही देशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.” त्यामुळेच आता आणखी चर्चा होते की नाही, किंवा आपण अखेरीस एखाद्या करारापर्यंत पोहोचतो की नाही, परंतु मला मनापासून असे वाटते की आता चेंडू इराणच्या कोर्टात आहे; कारण आम्ही आमच्या बाजूने चर्चेसाठी अनेक महत्त्वपूर्ण प्रस्ताव समोर ठेवले आहेत,” असेही यावेळी व्हान्स म्हणाले.
पाकिस्तानमधील शांतता चर्चा 21 तासांनंतर अखेरीस संपुष्टात आली; कारण इराणकडून आलेले शिष्टमंडळ कोणताही अंतिम करार करू शकले नाहीत, असे व्हान्स यांनी नमूद केले. या चर्चेमुळे तेहरानमध्ये निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे आहे, याविषयी काही महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. या विषयावर अधिक भाष्य करताना ते म्हणाले, “आम्हाला असे लक्षात आले की, इराणकडून आलेले शिष्टमंडळ करार करण्यास असमर्थ होते.” असेही व्हान्स यांनी यावेळी स्पष्ट केले.

























































