अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा वाटाघाटींसाठी भेट होणार; पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि अमेरिकेमध्ये इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा पार पडली. परंतु २१ तासांच्या या बैठकीमध्ये मात्र कोणताही तोडगा निघाला नसल्याचे, दोन्ही देशांनी जाहीर केले. यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सोमवारी सांगितले की, इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींची पुढील फेरी लवकरच अपेक्षित आहे. आसिफ यांनी ही माहिती शांतता चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच दिली आहे.

असोसिएटेड प्रेसच्या (एपी) वृत्तानुसार, अमेरिका आणि इराण यांच्यात गुरुवारी चर्चेची नवीन फेरी होण्याची शक्यता आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंकडून नवीन चर्चेची तयारी सुरू आहे. बैठकीचे नेमके ठिकाण आणि कार्यसूची यासंबंधीचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी, चर्चेसाठी गुरुवार हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. या चर्चेत दोन्ही बाजूंचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

शनिवारी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेली २१ तासांची चर्चा ही १९७९ नंतरची अशा प्रकारची पहिलीच घटना होती. याचे मुख्य कारण म्हणजे या चर्चेत दोन्ही बाजूंच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा सहभाग होता. तथापि, आठवड्याच्या अखेरीस पाकिस्तानमध्ये झालेल्या या चर्चेनंतरही, दोन्ही बाजूंच्या देशांना आपापसातील शत्रुत्व संपुष्टात आणणारा शांतता करार घडवून आणण्यात अपयश आले होते.