यंत्रणा उपलब्ध असूनही वारकऱ्यांचे प्रचंड हाल, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा गलथान कारभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सुनील उंबरे

अंध, अपंग, वयोवृद्ध आणि गरोदर महिलांना मंदिराकडे जाण्याचा मार्ग सुलभ व अधिक सुखकर व्हावा, यासाठी दानशूर भक्तांनी मंदिर समितीला सहा बॅटरी कार भेट दिल्या आहेत. लाखो रुपये किमतीच्या या कार सद्यस्थितीला मंदिर समितीच्या पार्किंगमध्ये धूळखात पडून आहेत. बॅटरी कारची सुविधा उपलब्ध असूनही तळपत्या उन्हात पायी जाणाऱ्या गरजू भाविकांचे असह्य हाल होत आहेत. मंदिर समितीच्या या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त होत असून, तळपत्या उन्हापासून भाविकांची सुटका करण्यासाठी मंदिर समितीने तातडीने कारसेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने पोलीस प्रशासनाने मंदिराकडे जाणारे सर्व प्रमुख मार्ग बॅरिकेड्स टाकून बंद केले आहेत. केवळ दुचाकी वगळता भाविकांचे कोणतेही वाहन मंदिर परिसरात सोडले जात नाही. त्यामुळे वारकरी भाविकांना आपली वाहने पार्किंग स्थळावर लावून मंदिराकडे पायी चालत जावे लागते. अंबाबाई मैदान ते भक्त पुंडलिक मंदिर आणि श्री संत गजानन महाराज मठ पार्किंग ते श्री विठ्ठल मंदिर या दोन्ही मार्गावरून चालत जाणाऱ्या भाविकांचे असह्य हाल होताना दिसत आहेत. अनेक भाविक तर अनवाणी पायांनी प्रदक्षिणा घालत असतात.
भाविकांची होणारी गैरसोय पाहून काही सामाजिक संस्था व दानशूर भाविकांनी मंदिर समितीला लाखो रुपये किमतीच्या बॅटरी कार भेट दिल्या आहेत. या भेटीमागचा उदात्त हेतू भाविकांची गैरसोय दूर व्हावी, असा आहे. मात्र, मंदिर समिती व्यवस्थापनाकडून याची चोख अंमलबजावणी होताना दिसत नाही.

पंढरीत दररोज हजारो भाविकांची वर्दळ आहे. यात शेकडोच्या संख्येने अबालवृद्ध, अंध, अपंग आणि गरोदर मातांचा समावेश असतो. कारसेवा उपलब्ध नसल्याने या सर्व गरजू भाविकांना नाईलाजाने चालत जावे लागत आहे. या भाविकांची अग्निपरीक्षा न घेता, समितीने तातडीने कारसेवा सुरू करण्याची आवश्यकता आहे.

श्री विठ्ठलभक्तांची सेवा केल्याचे पुण्य पदरी पडावे, भाविकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून मी पदरमोड करून दोन बॅटरी कार समितीला भेट दिल्या. या दोन्ही कार गायब आहेत. अनेकवेळा सूचना करूनही कर्मचारी चालढकल करतात. समितीचा कारभारी कामचुकारांना पाठीशी घालत असल्याने अपेक्षा सोडून दिली आहे.
– अॅड. माधवी निगडे, सदस्य, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती

सुविधा तातडीने सुरु करणार – प्रशांत गम

मी नुकताच पदभार घेतला आहे. मंदिराच्या कारभाराविषयी माहिती घेत आहे. हा विषय माझ्यासाठी नवीन असला, तरी तितकाच महत्त्वपूर्ण आहे. समितीकडे किती बॅटरी कार आहेत, सुविधा का बंद आहे, याची तातडीने माहिती घेऊन ही सुविधा तातडीने उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रशांत गम यांनी दिले.