
अमेरिकेने इराणविरोधात अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून इराणच्या प्रमुख बंदरांना लष्करी नाकेबंदीने वेढले आहे. अमेरिकन युद्धनौका आता होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ तैनात झाल्या असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. अमेरिकन जहाजांच्या जवळ येणारे कोणतेही इराणी जहाज तात्काळ नष्ट करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या नाकेबंदीचा मोठा फटका इराणच्या अर्थव्यवस्थेला बसणार असून, दररोज अंदाजे 40हजार कोटी रुपयांचे व्यापारी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही नाकेबंदी अरबी आखात आणि ओमानच्या आखातासह इराणच्या किनारी भागातून जाणाऱ्या सर्व जहाजांना लागू करण्यात आली असली, तरी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बिगर-इराणी बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना अमेरिका रोखणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
फॉरेन पॉलिसी संस्थेतील वरिष्ठ तज्ज्ञ मियाद मलेकी यांच्या मते, या नाकेबंदीमुळे इराणवर होणारा आर्थिक परिणाम तातडीचा आणि विनाशकारी असेल. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिलेल्या विश्लेषणानुसार, या सागरी नाकेबंदीमुळे इराणला दररोज निर्यातीत 196 दशलक्ष डॉलर्स आणि आयातीत 159 दशलक्ष डॉलर्सचा फटका बसेल. एकूण गणित मांडल्यास इराणचे दररोजचे नुकसान 435 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच प्रति महिना 13 अब्ज डॉलर्सच्या घरात जाऊ शकते.
या लष्करी कारवाईचा थेट परिणाम इराणच्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावरही होणार आहे. असलुयेह आणि इमाम खोमेनी यांसारख्या बंदरांवरून होणारी दररोजची 54 दशलक्ष डॉलर्सची पेट्रोकेमिकल निर्यात आता ठप्प होणार आहे. याशिवाय, इराणच्या बिगर-तेल निर्यातीपैकी सुमारे 90 टक्के माल याच आखाती बंदरांमधून जात असल्याने, दररोज 88 दशलक्ष डॉलर्सच्या बिगर-तेल व्यवहारांवरही गदा आली आहे. इराणकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीबाहेर जास्क आणि चाबहार यांसारखी पर्यायी बंदरे असली, तरी त्यांची क्षमता मोठ्या आखाती बंदरांच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने तेथे व्यापार वळवणे इराणला शक्य होणार नाही.
सर्वात गंभीर समस्या ही तेल उत्पादनाची ठरणार आहे. इराणची तेल साठवण क्षमता मर्यादित असून, 20दशलक्ष बॅरलची अतिरिक्त क्षमता उत्पादन सुरू राहिल्यास अवघ्या 13 दिवसांत संपुष्टात येईल. त्यानंतर इराणला आपल्या तेल विहिरी बंद करण्यावाचून पर्याय उरणार नाही. मलेकी यांनी इशारा दिला आहे की, इराणमधील जुनी तेलक्षेत्रे सक्तीने बंद केल्यास त्यांचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. यामुळे इराणची दररोज 3 ते 5लाख बॅरल तेल उत्पादन करण्याची क्षमता कायमची नष्ट होऊ शकते, ज्यामुळे देशाला वर्षाकाठी 9 ते 15अब्ज डॉलर्सचा मोठा आर्थिक फटका बसेल.

























































