
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इंटिग्रेटेड स्पोर्ट्स पॉलिसीबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांना फटकारले आहे. ”किती खाणार आहात तुम्ही, कुठे घेऊन जाणार आहात. पंतप्रधानांचे ना खाऊंगा ना खाने दूँगा हे धोरण महाराष्ट्रात लागू नाही, कारण फडणवीस आणि शिंदे एकत्र मिळून खातायत”, अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर घेतलं.
”इंटिग्रेटेड स्पोर्ट्स पॉलिसीच्या नावाखाली मुलांना खेळण्यासाठी जी मैदानं आहेत त्यातील 30 ते 40 टक्के जागा बिल्डरांना देणार. तिथे मॉल, फाईव्ह स्टार हॉटेल्स, क्लब्स बांधणार व त्यातून हजारो कोटी जमा करणार. ते परत आमदार खासदार विकत घेणार. मुलांची मैदानं खायची वेळ आलीय तुमच्यावर? काय चाललंय काय या राज्यात? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
”शिवाजी पार्कला तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेल बांधणार आहात का?. राज ठाकरेंच्या घरासमोर, बाळासाहेबांच्या स्मारकासमोर, जिथे संयुक्त महाराष्ट्राची मुहुर्त मेढ रोवली तिकड;r तीस टक्के जागा एकनाथ शिंदे कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेल मालकाला देणार आहेत?. आझाद मैदान, जांभोरी मैदान, नरे पार्कवर फडणवीस व एकनाथ शिंदे तुम्ही फाईव्ह स्टार हॉटेल बांधणार का? यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. किती खाणार आहात तुम्ही? कुठे घेऊन जाणार आहात? कशासाठी चाललं आहे हे सगळं. आता तुम्ही मुलांच्या मैदानापर्यंत आला आहात. पंतप्रधानांच्या ना खाऊंगा ना खाने दूँगा हे धोरण महाराष्ट्रात लागू नाही, फडणवीस आणि शिंदे एकत्र मिळून खातायत; असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे अत्यंत निर्दयी सरकार
आपल्या देशात एक प्रथा आहे. जिवंतपणी गायीची पूजा करायची नाही मृत्युनंतर अंत्ययात्रा काढायची आणि घोषणा करायची. लतादिदींच्या मृत्युनंतर त्यांच्या नावानं संगीत विद्यापीठ सुरू केलं. आशाताईंना मृत्युनंतर भारतरत्न देखील देतील. अत्यंत निर्घण आणि निर्दयी सरकार आहे. यांना कसली कला, संस्कृतीची जाणीव नाहीये, असे संजय राऊत म्हणाले.
”अंजली दमानियांनी काही नावं जाणीवपूर्वक वगळू नये. नाहीतर त्या रिकाम्या जागा आम्हाला भराव्या लागतील. मुख्यमंत्री कार्यालय त्यांना योग्य मदत करत आहे, जे मुख्यमंत्र्यांना थेट करता येत नाही ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करत असतील तर त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे” – संजय राऊत


























































