
चयापचयामधील बिघाडामुळे फॅटी लिव्हरचा आजार होण्याचे प्रमाण हे दिवसागणिक वाढू लागलेले आहे. त्यामुळेच ही एक मोठी जागतिक आरोग्य समस्या म्हणून आता समोर येत आहे. लॅन्सेटने केलेल्या नवीन संशोधनानुसार, गेल्या तीन दशकांमध्ये या रुग्णांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
‘द लॅन्सेट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी अँड हेपॅटोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, २०२३ मध्ये जगभरातील सुमारे १.३ अब्ज लोक यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. १९९० च्या तुलनेत ही तब्बल १४३ टक्के वाढ असून, यावरून आपल्याला जागतिक पटलावर या आजाराचे प्रमाण किती वाढलेले आहे याचा अंदाज येतो.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, संशोधकांनी इशारा दिला आहे की, २०५० पर्यंत यकृता संदर्भातील आजारांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. हे प्रमाण हे तब्बल १.८ अब्ज लोक या आजाराने ग्रस्त होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. या आजाराच्या वाढीचे मुख्य कारण म्हणजे वेगाने वाढणारी लोकसंख्या, लठ्ठपणाचे वाढते प्रमाण आणि उच्च रक्तशर्करा व चयापचय विकारांच्या घटनांमध्ये होणारी वाढ. शहरीकरण, बैठी जीवनशैली आणि अयोग्य आहार पद्धतींशी निगडित जीवनशैलीतील बदल हेच या आजाराचे मुख्य कारण जगभरामध्ये असल्याचे, निदर्शनास आलेले आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, जगाच्या इतर भागांच्या तुलनेत उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेसारख्या प्रदेशांमध्ये, यकृताचा आजार असण्याचे प्रमाण हे सर्वाधिक आहे.























































