समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना ‘रोबोट’ वाचवणार; नागाव, काशिद, श्रीवर्धन किनाऱ्यावर लाईफ सेव्हिंग वॉटर क्राफ्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भरती ओहोटीच्या वेळी खोल समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र आता रायगड जिल्ह्यातील तीन समुद्रकिनाऱ्यांवर बुडणाऱ्या पर्यटकांना ‘रोबोट’ वाचवणार आहे. पहिल्या टप्प्यात नागाव, काशिद आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांवर ‘लाईफ सेव्हिंग वॉटर क्राफ्ट’ तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे बुडणाऱ्या पर्यटकांना तत्काळ मदत मिळणार असून त्यांचा जीव वाचणार आहे.

अलिबाग, नागाव, मुरुड, काशीद, दिवेआगर, हरिहरेश्वर या समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी लाखो पर्यटक दाखल होतात. मात्र समुद्रातील भरती-ओहोटीचा अचूक अंदाज, खोल पाण्याचा अंदाज आणि सुरक्षा यंत्रणेचा अभाव यामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. याची दखल घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रायगड जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. अलिबाग तालुक्यातील नागाव, मुरुड तालुक्यातील काशीद, श्रीवर्धन समुद्रकिनारा येथे रोबोटिक लाईफ सेव्हिग वॉटर क्राफ्ट तैनात केल्या जाणार आहेत. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील इतर संवेदनशील किनाऱ्यांवर आणखी १५ क्राफ्ट उपलब्ध करून देण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

एकाचवेळी दोघांना किनाऱ्यावर आणण्याची क्षमता

रोबोटिक वॉटर क्राफ्ट पूर्णतः स्वयंचलित आहे. रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने ती किनाऱ्यावरून नियंत्रित करता येते. समुद्रात अडकलेल्या किंवा बुडणाऱ्या व्यक्तीकडे ही क्राफ्ट काही क्षणात पोहोचते. त्यावर असलेली विशेष फ्लोटिंग रचना आणि पकडण्याची सोय यामुळे बुडणारा व्यक्ती स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. एकाच वेळी दोन व्यक्तींना सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्याची क्षमता या वॉटर क्राफ्टमध्ये आहे. भरती-ओहोटीच्या वेळी जलद प्रतिसाद, मानवी हस्तक्षेप कमी त्यामुळे जोखीमही कमी ही वैशिष्ट्ये या यंत्रणेला पारंपरिक जीवरक्षक पद्धतींपेक्षा अधिक प्रभावी बनवतात