
ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात पारंपरिक सणाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. पारंपरिक चाडक पूजेदरम्यान ताडाच्या झाडावरून पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जगदीश सना असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मलकानगिरी जिल्ह्यातील एमव्ही-72 गावासह अनेक गावांमध्ये चैत्र महिन्याच्या शेवटी पारंपरिक चाडक पूजेचे आयोजन केले जाते. या पूजेमध्ये भगवान शिव आणि देवी काली यांना प्रसन्न करण्यासाठी भक्त उंच ताडाच्या झाडांवर चढतात आणि फांद्यांवरून चालतात. हा विधी श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक मानला जातो.
एमव्ही-72 गावातील जगदीश सना हा तरुण देखील ताडाच्या झाडावर चढून कसरती करत होता. यावेळी अचानक त्याचा तोल गेला आणि खाली पडला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला तात्काळ कलिमेला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
दरम्यान, एमव्ही-80 गावातही अशीच एक घटना घडली आहे. चाडक पूजेदरम्यान मिहिर मंडल नावाचा एक तरुणही ताडाच्या झाडावरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
























































