
तारापूर एमआयडीसीतील करमतारा इंजिनीयरिंग कंपनीत आज अचानक एलपीजी सिलिंडर पेटल्याने आग लागली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. मात्र आग लागताच कामगारांची पळापळ झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन ही आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यानिमित्ताने कंपनीतील शेकडो कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान आगीमागील नेमके कारण समजू शकले नाही.
तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक एस-38/1 येथे करसतारा इंजिनीयरिंग कंपनी आहे. वितळवून त्यापासून अँगल्स बनवण्याचे काम चालते. हे अँगल्स विविध वीज कंपन्या व अन्य कारखान्यांना पुरवले जाते. तीन शिफ्टमध्ये एकूण 500 ते 600 कामगार काम करतात. आज संध्याकाळी सातच्या सुमारास दुसऱ्या शिफ्टचे 200 कामगार काम करत असताना एलपीजी सिलिंडर पेटले. त्यामुळे कामगार जीवाच्या आकांताने कंपनीच्या बाहेर पडले. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीचे वृत्त समजताच त्यांनी धाव घेऊन आग विझवण्यास सुरुवात केली.
अग्नी सुरक्षेचे प्रशिक्षण दिले तरीही…
आगीचे बंब घटनास्थळी पोहोचताना अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यावर मात करून कंपनीतील आग विझवण्यात यश आले. तारापूर एमआयडीसीमधील अनेक कारखान्यांमध्ये आतापर्यंत अग्नी सुरक्षेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात आग लागते तेव्हा अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. अन्य यंत्रणा या घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याने कामगारांनी चिंता व्यक्त केली आहे.
























































