पक्ष म्हणजे कुणाच्या बापाची जहागीर नाही, जनतेची कामे न करणार्‍या मंत्र्यांना घरी पाठवा; आमदार संतोष बांगर यांचा घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विजय जोशी

सत्ता आल्यानंतर आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही जणांना मंत्री केले मात्र काही मंत्र्यांच्या डोक्यात वारं गेलं आहे. आमदारांचे फोन उचलले जात नाही, काम करणं तर बाजुलाच उंटावरून शेळ्या हाकणार्‍या मंत्र्यांना आता घरची वाट दाखवा, हा पक्ष म्हणजे त्यांच्या बापाची जहागीर नाही, अशी खदखद कळमनूरीचे आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केली आहे.

नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यातील शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांची व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक नांदेड येथे पार पडली. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी तक्रारीचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. ‘गेल्या सहा वर्षात नांदेड शहराला एक हजार कोटी रूपयांचा निधी मिळाला. महापालिकेच्या निवडणूकीत याचा फायदा होईल असे वाटले मात्र शहरातून केवळ चार नगरसेवक निवडून आले. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नाही, भाजपाला पाठिंबा देताना कार्यकर्त्यांशी संवाद साधला नाही, पक्ष अशोक चव्हाणांच्या दावणीला बांधला गेला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक आमदार कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत, त्यांची कामे करत नाहीत असा आरोप अनेकांनी केला.

पक्ष म्हणजे यांच्या बापाची जहागीर आहे काय? संतोष बांगर भडकले

या बैठकीत कळमनूरीचे आमदार संतोष बांगर यांचा पारा फारच भडकला. संतापलेल्या बांगर यांनी ‘एकनाथ शिंदे यांच्या  मुळे अनेकजण राज्यात मंत्री झाले. मात्र ते मंत्री आमचे काम करणेच सोडा उलट आमचे फोन ही घेत नाही”, असे मंत्र्यांसमोरच सुनावले. पुढे ते म्हणाले की, ”या मायबाप जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिले. काही मंत्री जर उंटावरून शेळ्या हाकत असतील तर अशा मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय पर्याय नाही, यांच्या डोक्यामध्ये वारं गेलं आहे आता त्यांना घरचा रस्ता दाखवलाच पाहिजे नाही तर जनता तुम्हाला माफ करणार नाही असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.