नोयडाच्या रस्त्यावर जे काल झाले तो या देशातील श्रमिकांचा आक्रोश होता – राहुल गांधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नोयडा येथे पगारवाढीसाठी कामगार गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत होते. सोमवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांच्या गाड्या फोडल्या. या घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक भलीमोठी पोस्ट शेअर करत सत्ताधारी मोदी सरकावर टीका केली आहे.

”काल नोएडाच्या रस्त्यांवर जे काही घडले, तो या देशातील कामगारांचा आक्रोश होता. एक असा आवाज जो प्रत्येक टप्प्यावर दुर्लक्षित राहिला, सततच्या विनवण्या करून जे आता पूर्णपणे थकून गेले आहेत. नोएडा येथे काम करणाऱ्या एका कामगाराचे मासिक वेतन १२,००० रुपये असते; मात्र, या उत्पन्नापैकी ४,००० ते ७,००० रुपये केवळ घराच्या भाड्यापोटीच खर्च होतात. त्यांना वर्षाकाठी ३०० रुपयांची वेतनवाढ मिळेपर्यंत, घरमालकाने भाड्यात आधीच ५०० रुपयांची वाढ केलेली असते. पगार वाढेपर्यंत बेलगाम महागाई त्यांचा गळा घोटते व त्यांना कर्जाच्या खोल गर्तेत लोटून देते, हेच तर “विकसित भारताचे” कटू वास्तव आहे”, असे राहुल गांधी म्हणाले.

”अमेरिकेचे शुल्क, युद्ध, जागतिक महागाई यांचा बोजा मोदीजींच्या ‘उद्योगपती मित्रांवर’ पडला नाही. याचा सर्वात मोठा फटका बसला तो रोजंदारीवर जगणाऱ्या कामगाराला.
तो कामगार ज्याचा कोणत्याही युद्धाशी काहीही संबंध नाही, ज्याने कोणतेही धोरण आखले नाही, ज्याने केवळ काम केले. निमूटपणे. कोणतीही तक्रार न करता. आणि त्या बदल्यात, जेव्हा तो आपले हक्काचे देणे मागतो, तेव्हा त्याला काय मिळते? केवळ दबाव आणि दडपशाही”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

मोदी सरकारने नोव्हेंबर २०२५ पासून नवीन ‘कामगार संहिता’ (Labour Codes) लागू केल्या आहेत. ज्यामुळे कामगारांचे कामाचे तास वाढवून दिवसाला १२ तास करण्यात आले आहेत. जो कामगार दररोज १२ तास उभे राहून कष्ट उपसतो, तरीही ज्याला आपल्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी चक्क कर्ज काढावे लागते. त्यांच्या मागण्या अवास्तव आहेत का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

”नोएडा येथील कामगार २०,००० रुपयांची मागणी करत आहेत. यात त्यांचा स्वार्थ नाही, हा त्यांचा हक्क आहे. त्यांच्या अस्तित्वाचाच तो आधार आहे. या राष्ट्राचा कणा असलेल्या, मात्र ज्यांना या सरकारने केवळ एक ‘ओझे’ म्हणून पाहिले आहे, अशा प्रत्येक कामगाराच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे”, असे राहुल गांधी यांनी सांगितले.