इराणचं ‘नाक’ दाबलं, पण सौदी अरेबियाने तोंड उघडलं! नाकेबंदी रद्द करण्यासाठी अमेरिकेवर मित्र राष्ट्राचा दबाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Saudi Arabia pressing the US to drop its blockade of the Strait of Hormuz

‘इस्लामाबाद टॉक्स’ निष्फळ ठरल्यानंतर इराणला नमवण्यासाठी अखेर अमेरिकेने इराणची नाकेबंदी करण्याचा मोठा निर्णय घेतला. इराणच्या बंदरावरून येणारे किंवा तिथे जाणारे एकही जहाज सोडले जाणार नाही असे अमेरिकेने स्पष्ट केले. यामुळे आखातातील कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू उत्पादक देशांमधील स्थिती पूर्णपणे कोलमडली आहे. अमेरिकेचा मित्रदेश असलेला सौदी अरेबियाची चिंता आता अधिक वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची कोंडी करण्यासाठी उचललेले पाऊल सौदी अरेबियाची परिस्थिती अधिक बिघडवणारी ठरू शकते. त्यामुळेच सौदी अरेबिया अमेरिकेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे.

‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, सौदी अरेबिया होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी रद्द करण्यासाठी आणि अमेरिकेला पुन्हा एकदा चर्चेच्या टेबलवर आणण्यासाठी ट्रम्प प्रशासनावर दबाव टाकत आहे. अरब अधिकाऱ्यांनी वृत्तपत्रा माहिती दिली की, ट्रम्प यांनी इराणी बंदरांचे मार्ग रोखल्यास इराण बिथरून अधिक आक्रमक होऊ शकतो. इराण इतर महत्त्वाचे सागरी मार्ग विस्कळीत करू शकतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी इराणची सर्व प्रकारची आयात-निर्यात रोखण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचा उद्देश आधीच मोडकळीस आलेल्या इराणच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढवण्याचा आहे. मात्र, सौदी अरेबियाने अमेरिकेला इशारा दिला आहे की, इराण याचे प्रत्युत्तर म्हणून तांबड्या समुद्रातील (Red Sea) ‘बाब अल-मंडब’ हा मार्ग बंद करू शकतो, जो सौदीच्या तेल निर्यातीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

सहा आठवड्यांच्या युद्धात इराणने जलमार्ग रोखून आपली ताकद जगासमोर सिद्ध केलेली आहे. तसेच या संपूर्ण प्रदेशातील महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची त्यांची तयारीही आहे. यामुळे शेजारील देशांना धोका असून त्यांचे गणित पूर्णपणे बदलले आहे. आखाती देशांच्या दीर्घकालीन कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू धोरणांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनी रोखल्यानंतरही, सौदी अरेबियाने वाळवंटातून तांबड्या समुद्रापर्यंत पाइपलाइनद्वारे कच्चे तेल पोहोचवले होते. त्यामुळे त्याची कच्च्या तेलाची निर्यात पूर्वपदावर म्हणजेच दिवसाला सुमारे ७० लाख बॅरल्सपर्यंत नेण्यात यश मिळवले होते. परंतु, तांबड्या समुद्राचा बाहेर पडण्याचा मार्गही बंद झाला, तर हा पुरवठा धोक्यात येईल, अशी भीती आता त्यांना सतावत आहे.

बाब अल-मंडब जवळील किनारपट्टीचा मोठा भाग येमेनमधील इराणचे मित्र असलेल्या हुथी बंडखोरांच्या ताब्यात आहे. इराणला सहकार्य करणाऱ्या हुथींनी गाझा पट्ट्यातील युद्धादरम्यान या जलमार्गात मोठे अडथळे निर्माण केले होते आणि आता इराण या गटावर हा मार्ग पुन्हा बंद करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे अरब अधिकाऱ्यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या मते, जर इराणला बाब अल-मंडब बंद करायचा असेल, तर हुथी हे त्यांचे नैसर्गिक मित्र आहेत. त्यांच्या मदतीने हा जलमार्ग रोखला जाण्याची भिती आहे.

इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी संबंधित ‘तस्नीम’ वृत्तसंस्थेनेही असे वृत्त दिले आहे की, अमेरिकेने इराणी बंदरांची नाकेबंदी केल्यास इराण तांबड्या समुद्राचे प्रवेशद्वार बंद करू शकतो. सोमवारी इराणने सशस्त्र दलांच्या निवेदनाद्वारे असाही इशारा दिला की, जर पर्शियन आखात आणि ओमानच्या समुद्रातील इराणच्या बंदरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला, तर या भागातील इतर कोणतेही बंदर सुरक्षित राहणार नाही.