ईशनिंदेच्या टीकेनंतर ट्रम्प यांनी स्वतःची येशूच्या रुपातील पोस्ट केली डिलीट; सारवासारव करण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःची येशूच्या रूपातील एआय-निर्मित पोस्ट डिलीट केली आहे. ट्रम्प यांनी रविवारी ही पोस्ट शेअर केल्यानंतर त्यांच्यावर ईशनिंदेबाबत तीव्र शब्दांत टीका करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सोमवारी ही पोस्ट डिलीट केली आहे. तसेच आपण स्वतःला डॉक्टर दाखवण्यासाठी ही पोस्ट केली होती. आपण स्वतःला येशूच्या रुपात दाखवले नाही, अशी सारवासराव करण्याचा प्रयत्नही केला.

पोप लिओ चौदावे यांनी जागतिक शांतता आणि लष्करी संयमासाठी केलेल्या सार्वजनिक आवाहनानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एआयनिर्मित स्वतःची येशूच्या रुपातील चमत्कार करतानाची प्रतिमा शेअर केली. तसेच पोप यांच्यावर टीकाही केली होती. त्याचा जगभरातून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. त्यानंतर सोमवारी त्यांनी ती पोस्ट डिलीट केली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर, स्वतःला ख्रिस्ताच्या रूपात दर्शवणारी आणि आजारी लोकांना ‘बरे’ करत असल्याचे दाखवणारी एक एआय-निर्मित प्रतिमा शेअर केल्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला होता. ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या प्रतिमेमध्ये ते लाल आणि पांढऱ्या रंगाच्या लांब झगा परिधान केलेले दिसत होते, ज्यात ते एका आजारी माणसाच्या कपाळाला स्पर्श करत होते आणि त्यांच्या हातातून व डोक्यातून प्रकाश बाहेर पडत होता. पार्श्वभूमीत एक अमेरिकन ध्वज फडकत होता, तर अनेक व्यक्ती आदराने राष्ट्राध्यक्षांकडे पाहत होत्या, अशी एआयनिर्मित प्रतिमा पोस्ट करण्यात आली होती.

वाद वाढत असल्याने काही तासांनंतर ट्रम्प यांनी ती पोस्ट डिलीट केली. त्यावर ते म्हणाले की, मला स्वतःला एक डॉक्टर दर्शवायचे होते. मी ती पोस्ट केली होती आणि मला स्वतःला एक डॉक्टर दाखवायचे होते. त्याचा संबंध रेड क्रॉसशी आहे. मी रेड क्रॉसचा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी एक डॉक्टर असून लोकांना बरे करत असल्याचे दाखवायचे होते, अशी सारवासारव त्यांनी केली. तसेच आपण येशू ख्रिस्तासारखे दिसण्याचा प्रयत्न करत असल्याचा इन्कार ट्रम्प यांनी केला. ही पोस्ट पोप लिओ चौदावे यांच्यासोबतच्या वाढत्या शाब्दिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आली होती. त्यामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले होते.