महामानवाला अभिवादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शोषित, पीडित, दीनदुबळय़ा समाजाबरोबरच महिलांच्या आयुष्याचे सोनं करणारे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आज मुंबईसह अवघ्या जगभरात मोठय़ा उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. चैत्यभूमी, दीक्षाभूमी तसेच बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ येथे लाखोंच्या संख्येने अनुयायांनी उपस्थित राहून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले.

सोमवारी सकाळपासूनच चैत्यभूमीवर लहानग्यांपासून आबालवृद्धांपर्यंत हजारोंच्या संख्येने अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, रणरणत्या उन्हात लांबच लांब शिस्तीने रांग लावून महामानवास अभिवादन केले. केवळ मुंबईच नाही तर राज्यभरातून, परदेशातून आलेले अनुयायी महामानवापुढे नतमस्तक झाले. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कलावंत, साहित्यिक, विचारवंत यांनीही चैत्यभूमी येथे आवर्जून उपस्थित राहत बाबासाहेबांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

n डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्व जातीधर्मातल्या लोकांनी उत्साहात साजरी केली.  ठिकठिकाणी सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम तसेच क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली. गोरगरीब विद्यार्थ्यांना वही, पेन, तसेच अन्य शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

विविध उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर जे. जे. इस्पितळात डॉ. हर्षोल्लास पानशेवडीकर यांनी रुग्णांना भोजनदान व फळ वाटप केले. कस्तुरबा इस्पितळातदेखील रक्तदान शिबीर तसेच अन्य कार्यक्रम घेण्यात आले. याशिवाय विविध संस्था, मंडळांनी भव्यदिव्य सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.