
उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मंगळवारी अतिरिक्त 168 उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली. यात एकही महाराष्ट्र राज्यांतर्गत गाडी नसून सर्व ट्रेन मुंबई-पुण्यातून परराज्यांतील प्रवाशांच्या सोयीसाठी धावणार आहेत. या अतिरिक्त गाड्यांच्या नियोजनातही रेल्वे प्रशासनाने कोकण तसेच उर्वरित महाराष्ट्राला ठेंगा दाखवला. त्यामुळे राज्यातील प्रवासी रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात मध्य रेल्वेने मंगळवारी अतिरिक्त 168 उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन जाहीर केले. या गाड्या मुंबईहून चेन्नई, हैदराबाद, संतरागछी, बनारस, बंगळुरूला जाणार आहेत. तसेच पुण्यातून गाझीपूर आणि संतरागछी या परराज्यांतील शहरांसाठी चालवण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला 1500 विशेष फेऱ्यांचे नियोजन केले. त्यात कोकणसाठी केवळ 36 गाड्या जाहीर केल्या. वास्तविक, उन्हाळी हंगामात लाखो लोक मुंबई-ठाण्यातून कोकणातील गावी जातात. पहिल्या टप्प्याच्या नियोजनात घोर निराशा करणाऱ्या मध्य रेल्वेने अतिरिक्त गाड्यांच्या नियोजनातही कोकण तसेच उर्वरित महाराष्ट्रासाठी एकाही गाडीची घोषणा केली नाही. रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्राला डावलून परराज्यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे.
रेल्वेने सापत्नभावाची वागणूक वेळीच थांबवावी!
मध्य रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्यांच्या घोषणेत दोन्ही वेळेला महाराष्ट्रावर अन्याय केला. राज्यातील प्रवाशांकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन परराज्यांतील शिक्षकांसाठी विशेष गाडीची व्यवस्था करते, याचे आश्चर्य वाटते. रेल्वेने महाराष्ट्राला दिली जाणारी सापत्नभावाची वागणूक वेळीच थांबवावी, याबाबत सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आवाज उठवावा, अशी भावना कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी व्यक्त केली.
परराज्यांसाठी विशेष फेऱ्यांचा बंपर धमाका
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून (सीएसएमटी) चेन्नईसाठी साप्ताहिक विशेष गाडीच्या 16 फेऱ्या, हैदराबादसाठी साप्ताहिक विशेष 24 फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथून संतरागछीसाठी 8, बनारससाठी तब्बल द्विसाप्ताहिक विशेष गाड्यांच्या तब्बल 40 फेऱ्या, बनारसच्या शिक्षकांसाठी 2 विशेष फेऱ्या, बंगळुरूसाठी साप्ताहिक विशेष गाडीच्या 26 फेऱ्या, पुण्यातून संतरागछीसाठी 8 विशेष फेऱ्या, गाझीपूरसाठी 44 फेऱ्या अशाप्रकारे परराज्यांवर विशेष फेऱ्यांचा बंपर धमाका जाहीर केला आहे. एप्रिलपासून जूनपर्यंत या विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.



























































