
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास बदनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक भीषण अपघात घडला. ओव्हरटेक करण्याच्या नादात एका खासगी ट्रॅव्हल्सने समोर जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, बसमधील इतर 43 प्रवासी सुरक्षित असून मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक 377.4 जवळ हर्ष ट्रॅव्हल्स ही बस समोरून जाणाऱ्या आयशर टेम्पोला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. याच प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस आयशरवर वेगाने आदळली. या धडकेत ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात चालक अंकित कुशवा (31) आणि शौर्य पवन सिंग (9) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच मेघा लक्ष्मण पांडे, खुशी चंद्रमोहन पांडे, नीलम पवन सिंग आणि पूर्वी पवन सिंग हे प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच समृद्धी कंट्रोल रूम आणि बदनापूर पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक काळे, वसंत राठोड, पोलीस कर्मचारी केदारे, जयलाल सुंदरडे आणि एमएसएफच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. सर्व जखमींना रुग्णवाहिकेमार्फत उपचारासाठी जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये एकूण 49 प्रवासी होते. जखमींव्यतिरिक्त इतर सर्व प्रवाशांना पोलिसांनी पर्यायी वाहन उपलब्ध करून देऊन पुढील प्रवासासाठी रवाना केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.




























































