अभिनेत्यांच्या हाती देश सोपवू शकत नाही; प्रकाश राज यांची थलपती विजयवर नाव न घेता टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेता थलपती विजय याचा तमिळगा वेत्री कळघम हा पक्षही या निवडणुकीमध्ये उतरला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून थलपती विजय आपल्या राजकीय कारकि‍र्दीचा शुभारंभ करत आहे. यावरून अभिनेते प्रकाश राज यांनी त्याच्यावर टीका केली आहे. अभिनेत्यांच्या हाती देश सोपवू शकत नाही, असे म्हणत प्रकाश राज यांनी अप्रत्यक्षपणे विजयवर निशाणा साधला आहे.

पालनी येथे माकप उमेदवार एन. पांडी यांच्या प्रचारसभेत बोलताना प्रकाश राज यांनी तामिळनाडूतील राजकारणाचे तीन प्रकारात वर्गीकरण केले. द्रविडीयन मॉडेल, गुलाम मॉडेल, सिनेमा मॉडेल अशी वर्गीकरण करत प्रकाश राज यांनी सिनेमा मॉडेलपासून सावध राहण्याचे आवाहन नागरिकांना केले.

चित्रपटात तुम्ही डॉक्टर, इंजिनिअर किंवा मुख्यमंत्रीही बनू शकता. पण खऱ्या आयुष्यात तुम्ही थेट मुख्यमंत्री कसे काय होऊ शकता? तुम्ही कधी लोकांसाठी, तमिळ भाषेसाठी किंवा स्वाभिमानासाठी भूमिका घेतली आहे का? लोकांनी तुमच्यावर केलेले प्रेम हे तुमच्या अभिनयासाठी आहे, राजकारणासाठी नाही, असा घणाघात प्रकाश राज यांनी थलपती विजयवर केला.

चित्रपट आणि राजकारण वेगळे असते असेही ते म्हणाले. चाहते उन्हात रांगेत उभे राहतात, तुमचे कट-आउट लावतात, तिकीटं काढतात. हे त्यांचं प्रेम आहे. मी सुद्धा एखाद्या अभिनेत्यासाठी टाळ्या-शिट्ट्या वाजवू शकतो, पण मी त्यांच्या हाती देश सोपवू शकत नाही. राजकारण ही एक मोठी जबाबदारी आहे, त्यासाठी जमिनीवर उतरून काम करावे लागते, असेही प्रकाश राज म्हणाले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, प्रकाश राज आणि विजय यांनी ‘घिल्ली’, ‘शिवकाशी’, ‘पोक्किरी’ आणि अलीकडेच ‘वारिसू’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रकाश राज हे विजयला प्रेमाने ‘चेल्लम’ म्हणतात. आगामी ‘जन नायगन’ या चित्रपटातही हे दोघे एकत्र दिसणार आहेत. मात्र, वैयक्तिक मैत्री बाजूला ठेवून प्रकाश राज यांनी विजयच्या राजकीय भूमिकेवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.