शेतकरी क्रांती मोर्चाचा सरकारला दणका; चांदवडमध्ये कांदा रस्त्यावर टाकून दिल्लीला जाणारा महामार्ग अडवला, तीन तास ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ मंगळवारी चांदवड येथे हजारो शेतकऱ्यांनी क्रांती महामोर्चा आंदोलन केले. मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड चौफुली येथे कांदा टाकून तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिल्लीला जाणारा महामार्ग ठप्प करण्यात आला. शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले. कांद्यासह शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, महागाई, इंधन दरवाढ त्याचबरोबर विविध समस्यांविरोधात मुंबईतील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी उद्या बुधवारी मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे.

कांद्याला पन्नास पैसे ते एक रुपया किलो असा मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आठ दिवसांपूर्वी आमदार रोहित पवार यांनी लासलगाव येथे शेतकऱयांची भेट घेऊन चर्चा केली. सरकारने कांद्याला हमीभाव दिला नाही तर दिल्लीला जाणारा महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा दिला होता. कांद्याचे भाव कोसळत असताना सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. सरकारच्या निक्रियतेच्या निषेधार्थ मंगळवारी हजारो कांदा उत्पादकांनी शेतकरी क्रांती महामोर्चा आंदोलन केले.

चांदवड चौफुलीवर सकाळपासूनच जिह्याच्या कानाकोपऱयातून शेतकऱयांचे जथेच्या जथे दाखल झाले. या ठिकाणी मुंबई-आग्रा महामार्गावर रास्ता रोको करून ठिय्या मांडण्यात आला.

शेतकऱयांनी रस्त्यावर कांदा फेकून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला. कांद्याला किमान तीन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव द्यावा, आतापर्यंत कमी भावात खरेदी करण्यात आलेल्या कांद्याचा फरक सरकारने शेतकऱयांना त्वरित द्यावा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात शिवसेना खासदार राजाभाऊ वाजे, काँग्रेस खासदार शोभा बच्छाव, राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे, माणिकराव शिंदे, माजी आमदार अनिल कदम, सुनील भुसारा, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन आहेर, प्रवीण नाईक, गोकुळ पिंगळे, कोंडाजीमामा आव्हाड, डॉ. सयाजी गायकवाड, विलास भवर, खंडू बोडके यांच्यासह माकप, शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

कांदा लेके, डंडा लेके हल्लाबोल अंबादास दानवे

शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला. कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, शेतकऱयांच्या प्रश्नांसह महागाई, इंधन टंचाई, शिक्षण, बेरोजगारी अशा प्रश्नांवर मुंबईत राज्यव्यापी आंदोलन करावे लागेल, अशी भूमिका मांडली. कांद्याची माळ गळ्यात घालून कांदा लेके, डंडा लेके मोदी सरकार, अमित शहा, केंद्र सरकार, राज्य सरकार, हल्लाबोल, हाय…हायच्या घोषणा दिल्या.

खोटारडे राज्यकर्ते हर्षवर्धन सपकाळ

काँग्रेस सत्तेत असताना 2014 मध्ये कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये भाव होता. आता मातीमोल भाव आहे. निवडणुकीपूर्वी चोवीसशे रुपये दर जाहीर करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता बाराशे रुपये दर जाहीर करून खोटारडेपणा दाखवून देत आहेत, असे टीकास्त्र्ा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दररोज खोटे बोलतात, त्यांच्या भांडकुदळपणामुळे अनेक देशांशी संबंध बिघडल्याने निर्यातीला खीळ बसली आहे.