मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकारची मराठा समाजाला न्याय देण्याचीच भूमिका आहे. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांना आश्वासने दिली आहेत. पाठीमागे कोणतीही आश्वासने दिलेली नाहीत. जी काही आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी स्वतः वाचून दाखवली आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी (ता. जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. मात्र, मुख्यमंत्री अभिवादन करून सभेला न थांबता लगेच हेलिकॉप्टरने दिल्लीला निघून गेले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मध्यरात्री उपोषण मागे घेतले. त्यांना कोणते आश्वासन दिले, अशी विचारणा केली असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जरांगे यांना जी आश्वासने दिली ती तुमच्यासमोर आहेत. मागे काही नाही. त्यांनी स्वतः तसेच मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवली आहेत. मराठी समाजाला न्याय देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.

जयंती महोत्सवाचे ऑडिट करण्याची मागणी राष्ट्रवादी काँगेसचे आमदार रोहित पवार यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांना टोला लगावताना कशाचे ऑडिट केले पाहिजे याचे भान ठेवले पाहिजे. इतक्या महत्त्वाच्या पर्वाला अशा पद्धतीने राजकीय रूप देणे योग्य नाही. राजकारण कोठे करावे, कोठे नाही याचे भान ठेवावे, असा मी त्यांना सल्ला देतो, असे ते म्हणाले. दरम्यान, देशाची हिंदू अस्मिता जागृत ठेवण्याचे, परकीय आक्रमणाच्या विरोधात सनातन धर्म जिवंत ठेवण्याचे काम अहिल्यादेवींनी केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, खासदार रामराव वडकुते, आमदार काशिराम दाते, मोनिका राजळे, सुनील कर्जतकर, गोपीचंद पडळकर, विठ्ठलराव लंघे, किरण लहामटे, हेमंत ओगले, अमोल खताळ, अक्षय कर्डिले, उत्तमराव जानकर, नारायण पाटील, बाबासाहेब देशमुख, सचिन कांबळे, तसेच माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आदी उपस्थित होते.

अहिल्यादेवींचे कार्य आजही आदर्शवत – सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्षे आदर्श राज्यकारभार केला. त्यांनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. देशभरातील धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार स्वतःच्या निधीतून केला. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. समाजातील दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी कार्य करताना त्यांनी लोकसेवा आणि जनहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचे कार्य आजही आदर्शवत मानले जाते.

चौंडी हे प्रेरणास्थळ – दत्तात्रय भरणे

दत्तात्रय भरणे म्हणाले, चौंडी ही केवळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मभूमी नसून प्रेरणास्थळ आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी केलेले कार्य आजही मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या विकासासाठी व सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे, असे कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले.

अहिल्यादेवींच्या कार्यातून समाजाला प्रेरणा – राम शिंदे

सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीचे विशेष महत्त्व आहे. जयंती महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आयुष्यभर लोककल्याण, न्यायनिष्ठ प्रशासन आणि समाजहितासाठी कार्य केले. त्यांच्या कार्यातून समाजाला आजही प्रेरणा मिळते.