‘हवाई शक्ती’तून हिंदुस्थानी सामर्थ्याची प्रचीती, कॅट्समधील खडतर प्रशिक्षणानंतर 59 लढाऊ वैमानिक वायुदलात रुजू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथील कॉम्बट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधील (कॅट्स) लढाऊ वैमानिक, आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टरसह पाच अभ्यासक्रमांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पदवीप्राप्त 59 अधिकारी वायुदलात रुजू झाले. त्यांच्या शानदार संचलनाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हवाई दलासह तोफखाना, पायदळ यांच्या युद्धभूमीवरील संयुक्त प्रात्यक्षिकांतून हिंदुस्थानी शक्तीचे दर्शन घडले. हा सोहळा देशाच्या सामर्थ्याप्रती जाज्वल्य अभिमान जागवणारा होता.

आर्मी ट्रेनिंग कमांडचे लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी कॅट्स येथे 45व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात लढाऊ वैमानिक, आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर, रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट इन्स्ट्रक्टर यासोबतच यंदा कम्बाईन इंटर्नल पायलट आणि निरीक्षक असे एकूण 5 अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या 59 वैमानिक, अधिकाऱ्यांनी संचलन केले. त्यांनी सखोल सैद्धांतिक शिक्षण, प्रगत सिम्युलेशन व आव्हानात्मक उड्डाण मोहिमांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

देवेंद्र शर्मा यांनी या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. भविष्यातील युद्धस्थितीत हे अधिकारी देशाला अभिमान वाटेल अशी कामगिरी बजावतील, असा विश्वास व्यक्त केला. हिंदुस्थानी वायुदलाच्या प्रगत तंत्रज्ञान वापरावर, प्रशिक्षणातील आधुनिकतेवर तसेच भविष्यातील सज्जतेवर प्रकाशझोत टाकला.

मानवरहित प्रणाली, अचूक लक्ष्यभेद क्षमता, अत्याधुनिक टेहळणी तंत्रज्ञानामुळे युद्धभूमीचे स्वरूप झपाट्याने बदलत असले तरी कठीण भूभागात शत्रूच्या हालचाली टिपणे, अग्निशक्ती पुरवठा, जखमींची सुटका यासाठी हेलिकॉप्टरचे महत्त्व कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध अभ्यासक्रमांतील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी लेफ्टनंट कर्नल सुमंत महाजन, मेजर अभ्येषकुमार सिंग, कॅप्टन मनीष गिरी, मेजर मोहितराज यांना चषक प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास कॅट्सचे मेजर जनरल अभिनय राय, अधिकारी, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

आनंद द्विगुणित करणारा सोहळा…

नाशिकच्या कॉम्बट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलमधून वैमानिक भरत भारद्वाज यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आणि ते देशरक्षणासाठी वचनबद्ध झाले आहेत. येथे मंगळवारी दीक्षान्त संचलनानंतर त्यांनी लढाऊ हेलिकॉप्टर्सला साक्षी ठेवूनच आणखी एक कर्तव्य बजावले, ते म्हणजे वाग्दत्त वधू आरुषी हिला अंगठी घातली. या क्षणाने भारद्वाज कुटुंबातील सदस्य, मित्र परिवाराचा आनंद द्विगुणित झाला.