पडद्याआडून- आता थांबवायचं कसं? सावध! ऐका पुढल्या हाका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत 

मोबाईल, सोशल मीडिया आणि आभासी जगाच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीसमोर उभ्या असलेल्या संकटांवर अनेक चर्चा होत असतात. मात्र त्याच वास्तवाला रंगभूमीवर परिणामकारकपणे उभे करण्याचे काम ‘आता थांबवायचं कसं?’ हे नाटक करतं. आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि अत्यंत खासगी गोष्टी आपण सोशल मीडियाच्या चव्हाटय़ावर अगदी बिनदिक्कतपणे मांडत असतो, ते योग्य की अयोग्य? एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा सांगताना हे नाटक आजच्या समाजातील याच ज्वलंत प्रश्नावर थेट बोट ठेवतं आणि त्यामुळेच ते केवळ मनोरंजन न राहता एक सामाजिक दस्तावेज ठरतं. अनवधानाने होऊ शकणारी एक छोटीशी चूक तुमच्या आयुष्यात कुठलं वादळ घेऊन येऊ शकते याचं भान देतं.

अरुण आणि रमा पिंपळकर हे प्रौढ जोडपं आपल्या तन्वी व चिराग या मुलांसोबत राहतंय. त्यांच्यासोबत अरुणची आई आहे. या पाच जणांचं हे एकजीव झालेलं हसरं आणि आनंदी कुटुंब तुमच्या आमच्यासारख्या कुटुंबासारखंच सुखी समाधानी आहे. अगदी दृष्ट लागावी असं. घरातील मुलीचं म्हणजेच तन्वीचं लग्न अवघ्या पंधरा दिवसांवर आलेलं असताना लग्नाच्या तयारीत गुंतलेल्या आणि त्या आनंदात न्हाऊन निघालेल्या कुटुंबावर एक अनपेक्षित संकट येतं. एक भयंकर आघात होतो. मुलीकडून झालेल्या त्या एका चुकीचा आपल्या कुटुंबाच्या भवितव्यावर किती विपरित परिणाम होऊ शकतो या नुसत्या विचारानेच सगळे हादरून जातात आणि ते हसरं कुटुंब अक्षरशः विस्कटून जातं. समाजाचा दबाव, प्रतिष्ठsचा प्रश्न, मानसिक घालमेल आणि नातेसंबंधांची कसोटी या सगळ्यांचे दडपण येतं व काय करावं हे त्यांना सुचेनासं होतं. आता पुढे काय होणार? हा प्रश्न नाटकातील पात्रांना आणि प्रेक्षकांनाही पडतो. मात्र या सगळ्या संघर्षात आपल्या मुलीला एकटं न सोडता तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे तिचे वडील आणि त्यानंतर अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी एकवटलेले तिचे कुटुंबीय हे त्या प्रश्नांची उत्तरं धैर्याने शोधून काढतात.

या नाटकाचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचा काळाशी असलेला थेट संवाद. स्मार्टफोनच्या चुकीच्या वापरामुळे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, सोशल मीडियावरील निष्काळजीपणाची किंमत कशी मोजावी लागू शकते आणि डिजिटल जगातील एक क्षणिक चूक संपूर्ण कुटुंबाला कशी वेठीस धरू शकते, याचा लेखाजोखा हे नाटक अस्वस्थ करणाऱया वास्तवासह मांडतं. ‘निर्जीव फोन स्मार्ट होत चालला आहे आणि जिवंत माणूस मूर्ख व बावळट’ हे विधान संपूर्ण नाटकाचा आशय एका वाक्यात सांगून जातं. ही गोष्ट आपल्या कोणाच्याही आयुष्यात घडू शकेल असं वाटायला लावणारी आहे आणि म्हणूनच आपण त्यात गुंतून जातो. एका टप्प्यावर येऊन नाटकातलं रंजनमूल्य मागे पडतं आणि आपण सगळेच त्या गंभीर प्रश्नाशी जोडले जातो. आता थांबवायचं कसं?

लेखक-दिग्दर्शक संदीप दंडवते यांनी कथाबीजातील हे नाटय़ दमदारपणे उभं केलंय. हे आपल्यासोबतही घडू शकतं या भावनेतून प्रेक्षकाला अस्वस्थ करण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखनात आहे. या घटनेनंतर त्या कुटुंबाच्या रोजच्या जगण्यात घडणारे बदल तपशीलवार दिसतात. सोबत चमकदार संवादांमुळे कथेची धार अधिक वाढते. प्रश्न निर्माण करून त्यांची तर्कशुद्ध उत्तरं शोधण्याचा प्रयत्न लेखकाने केलाय आणि तो यशस्वी ठरलाय. मानसशास्त्राचा खूप छान वापर करून एका गंभीर आणि अतिसंवेदनशील विषयाला हात घालण्याचा प्रयत्न स्पृहणीय आहे. दिग्दर्शकाने विषयाचा गाभा अचूक पकडला आहे. कुठेही अतिरेकी भावनिकतेचा किंवा स्वस्त नाटय़मयतेचा आधार घेतलेला नाही. नाटकाची भाषा आणि प्रसंगांची मांडणी वास्तववादी असल्यामुळे हे नाटक अधिकच भिडतं.

डॉ. गिरीश ओक यांनी साकारलेला पिता हा या नाटकाचा कणा आहे. संकटाने हादरलेला, पण मुलीसाठी कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवणारा बाप त्यांनी अत्यंत ताकदीने उभा केलाय. त्यांच्या अभिनयातला संयम आणि भावनिक तीव्रता अनेक प्रसंगांमध्ये प्रेक्षकांच्या काळजाला हात घालते. सुकन्या मोने यांची आईही तितकीच प्रभावी. कुटुंबाचे भावनिक संतुलन सांभाळणारी, आधी कोलमडून गेलेली आणि नंतर मुलीसाठी आधार होणारी धीरोदात्त आई त्यांनी अत्यंत सहजतेने रंगवली आहे. ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाच्या तब्बल तीस वर्षांनंतर गिरीश ओक आणि सुकन्या मोने ही जोडी रंगभूमीवर एकत्र आली असली तरी त्यांच्यातील सुसंवाद व रंगमंचावरील सहज वावर नाटकाला मोठी ताकद देतो. तन्वीच्या भूमिकेत ऐश्वर्या शेटेने जीव ओतून काम केलंय, तर चिराग म्हणून आकाश पाटील व्यवस्थित काम करतो. जान्हवी पणशीकरांनी साकारलेली आजी हे नाटकाचं सरप्राईज पॅकेज आहे. ते कसं? हे नाटकातच पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

हे नाटक स्मार्टफोनच्या बेफाम वापराच्या अनिष्ट परिणामांचा वेध घेतं. तसंच ते तरुण पिढीच्या वागण्यातला स्वैरपणा आणि बेफिकीरी यावरही अचूक बोट ठेवतं. स्वातंत्र्याचा चुकीचा अर्थ लावणाऱया या  नव्या पिढीला आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांचाही विचार करण्याची गरज आहे हे तथ्य अधोरेखित करतं. मात्र त्याच वेळी संकटाच्या क्षणी मुलांना केवळ दोषी ठरवण्याऐवजी त्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा पालकत्वाचा खरा अर्थही सप्रमाण दाखवून देतं. आजच्या काळात प्रत्येक घरातील प्रत्येक पालकाने आणि प्रत्येक तरुण-तरुणीने पाहावे असे हे ठाशीव नाटक आहे, जे प्रेक्षकांना एक घोटीव आणि गोळीबंद अनुभव देतं. अस्वस्थ करणारे वास्तव, समर्थ अभिनय आणि मनाचा ठाव घेणारा विषय यामुळे ‘आता थांबवायचं कसं?’ ही केवळ नाटय़कृती राहत नाही, तर ती कुटुंबांना सजग करणारी, समाजाला सावध करणारी एक प्रभावी रंगमंचीय हाक ठरते. या नाटकाने केशवसुतांची ती तुतारी नव्याने फुंकली आहे आणि आपल्याला सावध केलं आहे.

लेखक-दिग्दर्शक ः संदीप दंडवते

कलाकार ः सुकन्या कुलकर्णी मोने, जान्हवी पणशीकर, आकाश पाटील, ऐश्वर्या शेटे आणि डॉ. गिरीश ओक

नेपथ्य ः संदेश बेंद्रे

प्रकाश योजना ः रत्नकांत जगताप

गीत ः विघ्नेश जोशी

संगीत ः समीर म्हात्रे

वेशभूषा ः अमृता काकतकर

निर्माते ः समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर, प्रवीण भोसले आणि भरत नारायणदास ठक्कर

सूत्रधार ः दीपक गोडबोले