प्रकल्प सल्लागारांवर कोट्यवधींची उधळण, विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांचाही संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेकडे इंजिनीयरसह तज्ञ्ज अधिकाऱ्यांची टीम असताना प्रत्येक प्रकल्पासाठी पालिका सल्लागार नेमत असल्याने पालिकेचे कोटय़वधी रुपये वाया जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याला सत्ताधाऱ्यांनीही दुजोरा दिला. या वेळी गेल्या पाच वर्षांत पालिकेने कोणत्या प्रकल्पासाठी आणि किती सल्लागार नेमले याची माहिती देण्याची मागणीही स्थायी समितीमध्ये करण्यात आली.

पालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये पाणीपुरवठा प्रकल्पात डीपीआर बनवणे, 100 ते 150 खोल बोगदा बनवणे यासाठी सल्लागाराची गरज भासते. मुंबई महापालिकेकडे कर्तव्यदक्ष अभियंता आहेत. आपले अभियंता थांबतील, पण टीसीएस कंपनीची मोठी टीम असते. त्यामुळे किचकट प्रकल्पासाठी सल्लागार असणे गरजेचे आहे, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्थायी समितीत दिले. दरम्यान, सल्लागार नियुक्तीवर आक्षेप घेत 10 वर्षांत किती सल्लागार नियुक्त केले, याची माहिती द्यावी, अशी मागणी स्थायी समिती सदस्या श्रद्धा जाधव यांनी या वेळी केली.

पालिका म्हणते…

काही प्रकल्पांसाठी विशेष तांत्रिक कौशल्य, ज्ञान आणि अनुभवाची आवश्यकता असते. अशी तज्ञता महापालिकेच्या अंतर्गत यंत्रणेमध्ये नेहमीच उपलब्ध असेलच असे नाही. त्यामुळे अशा प्रकल्पांसाठी सल्लागारांची नियुक्ती केली जाते. सल्लागारांच्या निवडीसाठी भारतात आणि परदेशात तत्सम प्रकल्पांचा अनुभव तांत्रिक क्षमता आणि पात्र मनुष्यबळाची उपलब्धता, प्रकल्प नियोजन, रचना, अंमलबजावणी आणि व्यवस्थापनातील कौशल्य, मोठय़ा आणि गुंतागुंतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा अनुभव, अशा तंज्ञ व्यक्तींची सल्लागार म्हणून नियुक्ती केली जाते, असे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.