
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत सद्यस्थितीत 207089 दशलक्ष लिटर म्हणजेच फक्त 14.31 टक्केच पाणी उपलब्ध आहे. हे पाणी जुलैच्या मध्यापर्यंत पुरणार आहे. त्यामुळे पाऊस लांबल्यास मुंबईवरील जल संकट आणखी गडद होण्याची भीती आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज दररोज 4100 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठय़ात घट झाल्याने धरणात पुरेसे पाणी साठण्यापर्यंत नियोजनासाठी 15 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने ‘अल निनो’ वादळाबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कमी मान्सून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावांत पुरेसा पाणीसाठा जमा होईपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे. दरम्यान, अपुऱया पाणीसाठय़ामुळे राज्य सरकारच्या अखत्यारीतील भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा मिळाला आहे. भातसा धरणातून 1,47,092 दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा धरणातून 90,000 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
5 जूनचा जलसाठा
(दशलक्ष लिटरमध्ये)
मोडक सागर 43660
तानसा 13773
मध्य वैतरणा 38279
भातसा 96844
विहार 12417
तुलसी 2114
तीन वर्षांतील 5 जूनचे पाणी
2026 207089 दशलक्ष लिटर
2025 170375 दशलक्ष लिटर
2024 98181 दशलक्ष लिटर


























































