
मुंबईत झालेल्या मान्सूनपूर्व थोडय़ाशा पावसाने अंधेरी सब वे बंद करण्याची नामुष्की पालिका प्रशासनावर आली. पावसाळापूर्व कामांसाठी लाखो रुपये खर्च केले असताना ही स्थिती ओढवल्यामुळे पावसाळ्याआधीच सत्ताधारी भाजप-शिंदे गट आणि पालिका प्रशासनाचे पितळ उघडे पडल्याचा हल्ला पालिकेतील विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी केला.
पेडणेकर यांनी अंधेरी सब वे, मिलन सब वे आदी पाणी साचणाऱया ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी नालेसफाईची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी स्थानिक नगरसेवक प्रमोद सावंत उपस्थित होते.
नालेसफाईची आकडेवारी फसवी
नाल्यांची 100 टक्के सफाई झाल्याची आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक नाले अजूनही कचरा आणि गाळाने भरलेले असल्याने पेडणेकर यांनी पालिकेची आकडेवारी फसवी आणि बोगस असल्याचे पेडणेकर म्हणाल्या. विशेष म्हणजे सत्ताधारीच नालेसफाईबाबत जाहीर नाराजी व्यक्त करीत असल्यामुळे ही सत्ताधाऱयांवर आलेली नामुष्की असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.


























































