आरोग्य – साठी बुद्धी नाठी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. आशुतोष कुलकर्णी, [email protected]

चरक संहितेमध्ये वृद्धावस्था म्हणजे वातदोष प्रधान सांगितली आहे. आयुष्यभर कामासाठी केलेली धावपळ, मानसिक तणाव यातून अचानक सुटका झाल्याने मन थोडे अस्वस्थ राहते. अशा वेळी मनाचा संयम अत्यंत आवश्यक आहे. साठीनंतर मानसिक शांतता अत्यंत महत्त्वाची.

थोडा उपहासात्मक वाक्प्रचार असला तरी आयुर्वेदाच्या दृष्टीने खरोखरच साठीनंतर शरीरात वातदोषाचा प्रकोप झाल्याने धातूंची क्षीणता, स्मरणशक्ती कमी होणे, सांध्यांचे विकार, पचनशक्ती मंदावणे आणि ओज कमी होणे असे वयाचे परिणाम दिसू लागतात. चरक संहितेमध्ये वृद्धावस्था म्हणजे वातदोष प्रधान सांगितली आहे.

आयुष्यभर कामासाठी केलेली धावपळ, मानसिक तणाव यातून अचानक सुटका झाल्याने मन थोडे अस्वस्थ राहते. अशा वेळी मनाचा संयम अत्यंत आवश्यक आहे.

साठीनंतर मानसिक शांतता अत्यंत महत्त्वाची. ध्यान, नामस्मरण, वाचन, मित्र, समवयस्कांबरोबर, कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. यामुळे स्मरणशक्ती टिकते, नैराश्य कमी होते, रक्तदाब नियंत्रित राहतो.

वृद्धापकाळ म्हणजे रोग नव्हे; तो जीवनाचा नैसर्गिक टप्पा आहे. या वयात संयम, साधेपणा, शांत मन आणि योग्य दिनचर्या हेच सर्वोत्तम औषध मानले आहे. ‘अष्टांगहृदय’मध्ये ‘रसायन चिकित्सा’, दिनचर्या आणि वृद्धापकाळातील जीवनशैलीचे विशेष वर्णन आहे. त्यामुळे या वयातही आहार-विहार अत्यंत संतुलित असणे आवश्यक मानले आहे.

साठीनंतर शरीरात होणारे प्रमुख बदल म्हणजे पचनशक्ती मंदावणे,  स्नायू व हाडे कमजोर होतात, गुडघेदुखी, सांधेदुखी वाढते, झोप कमी होते, स्मरणशक्ती कमी होऊ शकते, त्वचा कोरडी पडते, बद्धकोष्ठता वाढते, हृदय व रक्तदाबाचे विकार वाढतात.

हे सर्व मुख्यत वाढलेल्या वातदोषामुळे होते.

साठीनंतरचा हलका, पण पौष्टिक आहार आवश्यक आहे .जड, तळलेले, कोरडे पदार्थ कमी करावेत. रोजच्या आहारात उकडलेले अन्न, मूगडाळ खिचडी, तूपयुक्त भात, गव्हाची पेज, साजूक तूप, भाजलेले जिरे-हिंगयुक्त पदार्थ समाविष्ट करावेत.

वातशामक आहार घ्यावा. उदाहरणार्थ तूप, तीळ, उकडलेल्या भाज्या, आलं, हळद, लसूण इत्यादी.

वात वाढवणारे पदार्थ म्हणजेच जास्त थंड पदार्थ, फ्रिजमधील अन्न, बिस्किटे, फरसाण, अति उपवास, कोरडे अन्न खाऊ नये. थोडक्यात काय तर पचनशक्तीनुसार खाणे महत्त्वाचे. वृद्धावस्थेत ‘अग्नी’ कमी होतो म्हणून थोडे-थोडे खावे, वेळेवर खावे, रात्री हलके जेवावे, अति भोजन टाळावे.

‘हितभुक्, मितभुक्, ऋतभुक्’ म्हणजे हितकारक, मोजके आणि योग्य वेळी खाणारा मनुष्य निरोगी राहतो.

या वयात आहारात प्रथिने व कॅल्शियम वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी मूग, मर्यादित प्रमाणात उडीद, ताक, दूध, तिळाचे लाडू, नाचणी, सुका मेवा हे हाडांसाठी उपयुक्त आहेत.

पाणी पिण्याचे काही नियम पाळले तर आरोग्य सुधारते. ऋतूनुसार कोमट पाणी उत्तम, एकदम जास्त पाणी नको. जेवताना घासाबरोबर घोट घोट पाणी प्या. जेवणानंतर किंवा आधी पाणी पिऊ नये. सकाळी उकळून कोमट केलेले पाणी प्यावे. कारण यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.

साठीनंतरची जीवनशैली सुधारण्यासाठी नियमित झोप आवश्यक आहे. दररोज  हलका व्यायाम करावा. अति व्यायाम नको.

चालणे, योग, प्राणायाम, सांध्यांचे हलके व्यायाम करावेत. ताडासन, वृक्षासन, पवनमुक्तासन ही उपयुक्त योगासने आहेत.

ऋतूनुसार अभ्यंग (तेल मालीश) वृद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आठवडय़ातून 2-3 वेळा तीळ तेल लावून गरम पाण्याने अंघोळ करणे हितकर आहे. तीळ तेलाने सांधे मजबूत राहतात, त्वचा कोरडी पडत नाही, वात कमी होतो आणि झोप सुधारते.

आयुर्वेदानुसार वृद्धावस्थेत अति मैथुन टाळावे. त्यामुळे पाक्षय, अशक्तपणा, गुडघेदुखी होते. थकवा वाढू शकतो. काही लोकांमध्ये या वयात काही प्रमाणात लैंगिक विकृती दिसून येते. त्यामुळे लैंगिक शोषणाच्या घटना या वयातल्या लोकांकडून होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. समाजात वावरताना या वयात संयम महत्त्वाचा आहे.

आयुर्वेदात वृद्धापकाळात ‘रसायन’ विशेष महत्त्वाचे मानले आहे. उदा. च्यवनप्राश, अश्वगंधा, ब्राह्मी, आवळा, शतावरी या औषधांचे वैद्यकीय सल्ल्यानेच सेवन करावे.