
>> वर्षा किडे कुलकर्णी
व्यावसायिक फोटोग्राफी करीअर म्हणून करताना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर छायाचित्रकार म्हणून ठसा उमटविणाऱ्या सीमा मोहन जोशी यांच्या कामाची ही दखल.
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात फोटोग्राफी या परंपरागत पुरुषी वर्चस्व आणि दबदबा असलेल्या व्यावसायिक फोटोग्राफीच्या क्षेत्रात महिलांनी दमदार वाटचाल केलेली आहे. हौशी छायाचित्रकार म्हणून नव्हे, तर करीअर म्हणून या क्षेत्रात उतरण्याचे आव्हान समर्थपणे पेलून यशस्वी छायाचित्रकार म्हणून अनेकींनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा रोविला आहे. व्यावसायिक फोटोग्राफीच्या क्षेत्रात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कार्याचा उल्लेखनीय ठसा उमटवणाऱया देशभरातील 40 यशस्वी महिला छायाचित्रकारांचा शोध घेऊन त्यांचे मनोगत, प्रवास, आव्हाने व भविष्यातील स्वप्न यांचा उत्तम वेध लेखक प्रवीण घोडेस्वार यांनी ‘कॅमेरामागची ती’ या पुस्तकात घेतला आहे.
?नागपुरातील तिघींमध्ये सीमा मोहन जोशी यांची निवड या पुस्तकात झाली आहे. खान्देशातील धुळे येथील छायाचित्रणासाठी सुप्रसिद्ध अशा मुधोळकर घराण्यात सीमाचा जन्म झाला. 1920 साली स्थापन झालेल्या ‘मुधोळकर आर्ट स्टुडिओ’ या पंपोशीत प्रसिद्ध असलेल्या आजोबांच्या स्टुडिओत आजोबा, आजी, वडील, काका, भाऊ यांना काम करताना बघत सीमा लहानाच्या मोठय़ा झाल्या.
?दहावीपासून वडिलांना मदत करत फोटो ‘री टच’ करायला, लाईट व स्टॅन्ड लावायला, डार्क रूममध्ये फोटो डेव्हलप करायला त्या शिकल्या. सीमाची आवड पाहून आजी-आजोबा, आई-वडिलांनी मुलगी आहे म्हणून काम करण्यास कधीच आडकाठी केली नाही. छायाचित्रण कलेचा जन्मजात ‘जनुकीय वारसा’ असल्याने महाविद्यालयीन शिक्षण होईपर्यंत त्या फोटो काढायला शिकल्या.
?1990 साली नागपूरच्या सिव्हिल इंजिनीअर मोहन जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. छोटय़ा कॅमेऱयाने कौटुंबिक सोहळ्याचे आणि नंतर पतीने डीएसएलआर कॅमेरा सप्रेम भेट दिल्यावर भावाच्या प्रोत्साहनाने व्यावसायिक फोटोग्राफी त्यांनी सुरू केली. लग्न, मुंज, वाढदिवस, डोहाळ जेवण या कार्पामांचे फोटो काढतानाच वर्तमानपत्रासाठी लागणाऱया फोटोचे तंत्रही त्यांनी शिकून घेतले. अडीअडचणीला त्या भावाचे मार्गदर्शन व पतीच्या सहकार्याने वाटचाल करत होत्या.
?व्यावसायिक फोटोग्राफी करताना मोठमोठय़ा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांगीतिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्पामांसाठी त्यांना आमंत्रित करण्यात येऊ लागले. परिणामी सीमा यांनी भरपूर सरावाने कॅमेरा कौशल्यपूर्वक हाताळत व्यवसायात चांगला जम बसवला. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
?राष्ट्रसेविका समिती, पद्मगंधा प्रतिष्ठान, अभिव्यक्ती, साहित्य विहार, गीत सौरभ या संस्थांच्या कार्पामांतून अनेक नामवंतांचे फोटो काढण्याची संधी त्यांना मिळाली. भावाबरोबरच नागपूरच्या राहुल, वैभव, प्रमोद, रवी, संदीप आणि मैत्रिणी अनघा, नीलम, स्वरूप पॅशन व रूपाली स्टुडिओ या सर्व फोटोग्राफर्सचे सहकार्य त्यांना कायम मिळत असते.
व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून गेल्या दोन दशकांपासून कार्यरत असलेल्या सीमा मोहन जोशी यांच्या कौशल्याची, मेहनतीची, कष्टाची, चिकाटीची दखल घेऊन त्यांना राम गणेश गडकरी ट्रस्ट सावनेर, नवनाथ ट्रस्ट नागपूर, सूरसप्तक, गरिमा महिला समिती, पद्मगंधा प्रतिष्ठान यांनी पुरस्कार प्रदान करून गौरवांकित केले आहे. राष्ट्र प्रथम हे ध्येय असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या त्या सेविका आहेत.
फोटोग्राफीच्या क्षेत्रात करीअर करू पाहणाऱया नव्या पिढीने कुशल फोटोग्राफर व्हायला योग्य प्रशिक्षण, शिक्षण, प्रेरणा, प्रोत्साहन, योग्य साधने, सुविधा, सामाजिक मानसिकता बदलणे, कौटुंबिक पाठबळ याबरोबर फोटोग्राफीची आवड, सहनशीलता, शांतपणा, चपळपणा या गुणांना आत्मसात करावे असा सीमा यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
मोबाईल फोटोग्राफीचा व्यवसायावर फारसा परिणाम झालेला नसून मोबाईल फोटोग्राफी ही हौशी फोटोग्राफरपुरतीच मर्यादित राहील. व्यावसायिक फोटोग्राफी गुणवत्तेत अव्वल असल्याने तिला मरण नाही. उलट या व्यवसायात नवनवीन आव्हाने, तंत्र व प्रकार येत आहेत. त्यामुळे सीमा या नवीन तंत्र आत्मसात करत स्वतला कायम अपडेट ठेवत असतात.
गृहिणी म्हणून संसाराच्या सर्व जबाबदाऱया पार पाडतानाच दिवसदिवस, तासन्तास उभं राहून काम कराव्या लागणाऱया व्यावसायिक फोटोग्राफीच्या क्षेत्रात उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या या मनस्वी कलाकाराचे कौतुक वाटते.


























































