
>> वर्णिका काकडे
मराठवाडी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिह्यांत बोलली जाणारी प्रमुख मराठी बोलीभाषा आहे. या बोलीला एक खास गोडवा, नादमधुरता आणि सांस्कृतिक समृद्धी लाभली आहे.
मराठवाडा हा प्रदेश ऐतिहासिक काळात निजामाच्या अधिपत्याखाली होता, तसेच तो कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे या बोलीवर उर्दू शब्दांचा मोठा प्रभाव जाणवतो. तसेच सीमेवरील जिह्यांत बोलताना कन्नड आणि तेलगू भाषेचा हेलही उच्चारात दिसून येतो. महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात, धाराशिव व लातूर जिह्यात या बोलीचे एक वेगळेपण दिसून येते. या भागातील संस्कृतीचा खास स्पर्श या भाषेला आहे. त्यात एक वेगळीच नजाकत आहे. बोलताना कानडीचा हेल व क्रियापदावर परिणाम जाणवतो. मात्र कानडी भाषेचा प्रभाव या भाषेवर नाही. महाराष्ट्र व तेलंगणा या सीमावर्ती भागातही मराठवाडी बोली बोलली जाते. या ठिकाणी सुद्धा तेलुगू भाषेचा मोठा परिणाम जाणवतो
मराठवाडी बोलीचे तिचे असे एक वळण आहे, खास खुमारी आणि या बोलीतील अगणित शब्दांचा लक्षणीय असा ठसा आहे. ही बोली कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी आणि अतिशय सूचक आहे. उदा. ‘मी शेताला पाणी देत आहे’ हे वाक्य मराठवाडीत ‘मी दारे धरतो का’ असे म्हटले जाते. तसेच शब्दांमध्येही मटण हा शब्द ‘वशाट’, थोडेसे ला ‘उलुसं’, सर्पदंश ऐवजी ‘पान लागणे’, सर्व ऐवजी ‘समदा’ असे शब्दप्रयोग केले जातात.
मराठवाडी बोलीची खास ओळख म्हणजे तिची खुमारी आणि नादमधुरता. ही नादमधुरता तिच्या नादानुकारी शब्दांच्या आणि द्विरुक्ती शब्दांच्या वापरामुळे येते. उदा. टुकटुकू, धडाधड, बचाबचा, फिदीफिदी, मुळूमुळू. तसेच या बोलीत ‘पोतेरा’, ‘मोप’, ‘बक्कळ’, ‘कडुसार’, ‘साळा’ असे अनेक विशिष्ट शब्द आढळतात.
या बोलीत काही क्रियापदांमध्येही वेगळेपण आणि लय दिसून येते. जसे- काय करत आहात ऐवजी काय करताव, काय करत आहेस ऐवजी ‘काय करायलास’.
मराठवाडी बोलीचे जतन करण्यासाठी विविध संस्था आणि अभ्यासक प्रयत्नशील आहेत. या बोलीच्या साहित्यात आणि संशोधनात तिचे वेगळेपण अधोरेखित केले जाते.


























































