
कर्नाटक प्रांतातील स्त्री संत परंपरेत ‘मुडलाणी’ परंपरांचा निर्देश आहे. विवेकसिंधु या आद्य मराठी ग्रंथाशी मुडलणी परंपरेचा संबंध आहे. या घराण्यातील स्त्रियांना स्वामी म्हटले जाते. संत मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई यांच्या कवितेतून निर्माण झालेली उत्कट भक्ती, श्रद्धा, संप्रदायनिष्ठा आपल्याला मुडलणी परंपरेतील राधाबाई, पार्वतीबाई, गंगाबाई यांच्या अभंगात आढळते. दरवर्षी पंढरीची वारी करणाऱया राधाबाई यांची पदे महाराष्ट्र सारस्वतात आजही आहेत. काही अभंग ‘प्राचीन गीतमंजुषा’ या ग्रंथात आढळतात. ‘दांडगा हा पती माझा कैसा सये गं। मागे पुढे अखंड उभा राहे।।’ पंढरीची वारी, वारीतील दिंडय़ा, पालख्या पाहून भक्ताचे विठ्ठलाशी असलेले नाते राधाबाई आपल्या अभंगात सांगतात. संत पार्वतीबाई यांच्या काव्यात महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा घाट आणि थाट दिसतो. ‘ज्यासी स्वरूप साक्षात्कार। जे विश्रांतीचे माहे।। भक्तिज्ञान वैराग्य थोर। तेचि परब्रह्म साचार।।’ या पदात त्यांनी सत्संगाचे महत्त्व सांगितले आहे. प्रपंच करून परमार्थ साधणाऱया स्त्रियांचे दर्शन त्यांच्या अभंगात आढळते.


























































