
>> प्रवीण दवणे
आपल्या मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी आवाजाने अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱया ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे नुकतेच निधन झाले. मराठी भावगीताला अक्षय वासंतिक मोहोर देणारे हे स्वर कायम चिरंतन राहतील.
आपले संवेदनात्मक आयुष्य समृद्ध करणारे स्वर कायमच आपली सोबत करतात. त्यातील आदरणीय स्वर म्हणजे सुमनताई कल्याणपूर. लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या स्वरभारल्या युगातही नाममुद्रा उमटवणारा हा स्वर! गाण्यात एक अनामिक हुरहुर जागवणारा! गाण्याचा प्रकार कुठलाही असो, त्यांच्या स्वरातील आपुलकी त्यात मिसळलेली असते. ती काळजाजवळ मोरपिसासारखी ठेवावीशी वाटते. ‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पहाते’ हे जनकवी पी.सावळाराम आणि वसंत प्रभू कवी-संगीतकार युतीने दिलेले गाणं तुम्ही जितक्या वेळा ऐकाल तितक्यांदा सागरकिनारी उभी असलेली मनातली प्रेयसी तुम्हाला ओढ लावेल. हुरहुरीचे मौन आयुष्य हेसुद्धा स्वरांना आर्त परिमाण देते. एक प्रगल्भ कलात्मक समर्पण सुमनताई कल्याणपूर यांच्या स्वरात आहे. अलिप्तता आहे. ‘लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू! इथून दृष्ट काढते निमिष एक थांब तू’ हे ‘एकटी’ चित्रपटातील सुलोचना यांच्यावर चित्रित झालेले वात्सल्य गीत क्षणभर आठवा.
सुमनताई कल्याणपूर यांच्या स्वरामुळे त्या माऊलीचे वात्सल्य अधिक काळीजवेधी झाले आहे. कलावंत समर्थ अभिनयातून व्यक्त होतातच, पण त्यापूर्वी पार्श्वगायक आपल्या स्वरांतून तो अभिनय करण्यासाठी चेहऱयाला संधी देत असतात. सुमनताईंचा स्वर हा स्वरांतून भूमिका जगणारा स्वर आहे. ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटातील ‘कसे करू स्वागता? एकांताचा आरंभ कैसा कशी करू सांगता?’ सुमनताईंच्या स्वरामुळे नायिकेची लगबग, अगदी अचानक मिळालेला दुर्मिळ एकांत, त्यामुळे नवपरिणितेची अधीर धांदल या सर्व गोष्टी सुमनताईंच्या स्वरांनी मूर्तिमंत साकार केल्या आहेत. ‘मानिनी’ चित्रपटातील ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर’ हे बहिणाबाई चौधरी यांचे काव्य असो की ‘बाळा गाऊ कशी अंगाई?’ मधील विख्यात अंगाई ‘निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’ ही असो की ‘ओमकार प्रधान रूप गणेशाचे’, सुमनताई कल्याणपूर यांचा स्वर त्यातील भावचित्र मनात साकार करतो. ‘अरे संसार संसार’ कवितेतील प्रपंचाचे ओझे सोसणारी ती एक आई आणि अंगाईमधील वात्सल्याने तृप्त झालेली आई साकार करावी ती सुमनताईंनीच.
हिंदी चित्रपटात सुमनताईंच्या स्वरांनी स्वतची नाममुद्रा उमटवली आहे. गझल, ठुमरी, शास्त्राrय असे अनेक गायन प्रकार, जवळ जवळ सतरा भाषांमधून सात दशके कारकीर्द गाजवणे ही अशक्य गोष्ट आहे. छटा तरी किती प्रकारच्या आहेत. उदा. ‘दिल की किताब कोरी है, कोरीही रहने दो!’ हे ‘यार मेरा’ या चित्रपटातील राखी यांच्यावर चित्रित झालेले अप्रतिम युगुल गीत आहे. ‘चले जा चले जा चले जा, जहां प्यार मिले, चलना ही जिंदगी है; रुकनाही मौत तेरी’ असा प्रीतविरह आणि आयुष्य यांची गुंफण करून जीवनाचा संदेश सुमनताई कल्याणपूर त्याच प्रवाहीपणे व्यक्त करतात. तोच स्वर ‘आज कल तेरे मेरे प्यार की चर्चा है जबानपर’ या गाण्यातील अवखळपण तितक्याच गुलाबी रंगात व्यक्त करतात. ‘तुमने पुकारा और हम चले आये, जान हथेली पे ले आये रे’ या गीतातून प्रेयसीचा समर्पित भाव हृदयाला स्पर्श जातो. तो स्वरही सुमनताई कल्याणपूर यांचाच. ‘ना तुम हमे जानो ना हम तुम्हे जाने’ या शब्दातील भावार्तता आज सहा दशकांनंतरही आपल्या हृदयात कंपने निर्माण करते. ‘परबतो के पेडोंपर शाम का बसेरा है’… निसर्ग सौंदयातून जिवलग प्रीतीची आत्मीयता आपल्या डोळ्यांपुढे भूतकाळ उभा करते ती सुमनताईंच्या स्वरांतून. ‘जान चली जाये.. जिया नही जाये’ यातील तगमग कुठल्याही वयाला पंचविशीचा मोहर देते.
मराठी भावगीतांना सुमनताईंच्या स्वरांनी अक्षय वासंतिक मोहोर दिला आहे. ‘शब्द शब्द जपून ठेव, बकुळीच्या फुलापरी’ हे मंगेश पाडगावकर यांचे काव्य विश्वनाथ मोरे यांच्या संगीतात आपण अनेकदा ऐकले आहे. स्वरांच्या ओंजळीतून एकेक शब्द आपल्या संवेदनांशी संवाद साधतो, वाऱयाच्या झुळुकीवर हळूहळू बकुळीची फुले तरंगत यावीत तसा स्वर सुमन कल्याणपूर यांचा. त्याच ध्वनिमुद्रिकेतील ‘तुला ते आठवेल का सारे? दवात भिजल्या जुई परि हे मन हळवे झाले रे!’ असे प्रीतीच्या स्मरण प्रदेशात नेणारे स्वर सुमनताईंचेच. पंच्याहत्तरच्या दशकात तजेलदार मोहर घेऊन सुमनताईच्या मधुर भावगीतांचे नवे युग सुरू झाले. सुदैवाने त्या काळात आवडत्या गाण्याची वाट पाहत रेडिओला कान लावलेले असायचे. आकाशवाणी भावगीताच्या त्या युगात संगीतकार अशोक पत्की यांनी अशोकजी परांजपे यांच्या कवितांना दिलेली चार नवी गाणी प्रत्येक क्षणाचा वसंत करीत आली. अर्थात् ती चारही गाणी सुमन कल्याणपूर यांनी गायलेली होती. समर्थ काव्य आणि स्वरांतून कायमच अम्लान राहिलेला पहाटेचा प्राजक्त!
जाता जाता एक उल्लेख नि व्यक्तिगत आठवण नम्रपणे सांगावीशी वाटते. कवी आणि गीतकार म्हणून माझे भाग्य आहे, या दैवी सुरांचा स्पर्श माझ्या तीन भावगीतांना अगदी योगायोगाने लाभला. लतादीदी आणि आशाताईंचा दैवी सूर माझ्या शब्दांना यापूर्वी लाभला होता, परंतु सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात माझे एकही गाणे तोपर्यंत ध्वनिमुद्रित झाले नव्हते. मला आस होती, निदान माझे एक तरी गाणे सुमनताईंनी गावे. ही संधी मला केवळ संगीतकार शांक-नील यांच्यामुळे मिळाली. व्हीनस कंपनीने प्रकाशित केलेल्या ‘ते सूर ऐकता’ या ध्वनिमुद्रिकेच्या निमित्ताने सुमनताईंच्याच घरी भेट होऊ शकली. भावगीतातील काव्य सुमनताई किती आपुलकीने समजून घेतात ते या ध्वनिमुद्रिकेच्या निमित्ताने मी अनुभवले. माझ्यासारख्या त्यावेळच्या तरुण कवीकडून कविता पुनः पुन्हा वाचून घेणे, आशय समजून घेणे आणि त्याच्यावर चर्चा करणे त्यांना आवश्यक वाटत होते. याच ध्वनिमुद्रणातील सुमनताईंच्या गीत निवड जाणिवेची एक आठवण वाचकांना अगदी नवी वाटेल. माझ्या एका भावगीताचे शब्द होते, ‘शब्दांचा मोर भिजे श्रावणात झुरताना, येशील तू, येशील तू, सांगीन मी श्वासांना!’
सुमनताईंना ते शब्द आवडले खरे, परंतु त्यांनी एक छोटा बदल सुचवला. तोही ‘असा बदल चालेल का?’ हे त्यांनी आग्रह न करता विलक्षण रुजुतेने विचारले. त्या म्हणाल्या, “येशील तू येशील तू’ ऐवजी ‘येशील तू, तू येशील’ असे आपण करू या का?’’ मला त्याचे प्रयोजन कळले नाही. सुमनताईंना माझ्या चेहऱयावर ते जाणवले. मग किंचित हसून त्या म्हणाल्या, “तू येशील!’ हे ती ठामपणे म्हणते. कारण प्रियकराच्या येण्यावर तिची ठाम श्रद्धा आहे. आता समोर नसलेल्या, परंतु आपल्या प्रेमावर विश्वास असल्यामुळे ‘तो येणारच!’ या खात्रीने हा विश्वास व्यक्त करत आहे. म्हणून ‘येशील तू ..येशील तू’ऐवजी ‘तू येशील’ असे आपण करू या का?’’ मी होकार तर दिलाच; परंतु सत्तरीच्या वयातही सुमन कल्याणपूर आपल्या मनात एक उत्कट जिवलग मन जपून आहेत याचा साक्षात्कार मला झाला.
लतादीदी मंगेशकर, आशाताई या दोन युगप्रवर्तक स्वरस्वामिनींसोबत संगीत क्षेत्रात आपली स्वतंत्र मुद्रा उमटवणे हा अलौकिक चमत्कार सुमनताई कल्याणपूर यांच्या स्वर कारकीर्दीने केला. लतादीदी आणि आशाताई अशा व्यक्तिमत्त्वांच्या मागोमाग ईश्वराने तितक्याच तोलाचे व्यक्तिमत्त्व आपलेसे केले आहे. त्यांची गाणी आपल्याला विचारत राहतील,
‘तुला ते आठवेल का सारे…’
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)


























































