
>> अभय मिरजकर
महाराष्ट्र ही संतांची आणि मंदिरांची भूमी आहे. या भूमीत अशी अनेक ठिकाणे आहेत, जी आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपत शांतपणे उभी आहेत. असंच एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्लक्षित ठिकाण म्हणजे लातूर जिह्यातील ‘महापूर’ येथील मांजरा नदीच्या काठावर असलेले आगळेवेगळे शिवलिंग असणारे छोटेसे मंदिर.
महापूरचे हे अष्टोत्तर शत शिवलिंग केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नाही, तर ते आपल्या पूर्वजांच्या प्रगत शिल्पकलेचा आणि गणिताचा 108 शिवलिंगांची विभागणी करणारा एक भक्कम असा पुरावा आहे. सामान्यत आपण मंदिरात एकच मुख्य शिवलिंग पाहतो. मात्र महापूर येथील या शिवलिंगाला ‘अष्टोत्तर शत शिवलिंग’ (म्हणजेच 108 शिवलिंगे असलेले) म्हटले जाते. हिंदू धर्मात आणि विशेषत शैव संप्रदायात 108 या अंकाला अत्यंत पवित्र मानले जाते. या ठिकाणी मुख्य शिवलिंगावर सूक्ष्म स्वरूपात 108 छोटी शिवलिंगे कोरलेली आहेत.
बहुतेक ठिकाणी ‘अष्टोत्तर शत शिवलिंग’ हे मुख्य शिवपिंडीवर (लिंगावर) कोरलेले असते, परंतु महापूर येथे हा मोठा अपवाद पाहायला मिळतो. येथे मुख्य शिवलिंगाच्या शाळुंकेच्या (पिंडीच्या खालचा भाग) पृष्ठभागावर 108 शिवलिंगे कोरलेली आहेत. जी कुठेच पाहायला मिळत नाहीत. तीन ओळींत त्यांची विभागणी केली आहे. पहिली ओळ ः 40 शिवलिंगे, दुसरी ओळ ः 35 शिवलिंगे, तिसरी ओळ ः 33 शिवलिंगे, अशी एकूण 108 शिवलिंगे आहेत.
ही सर्व शिवलिंगे आकाराने अत्यंत प्रमाणबद्ध आणि एकमेकांशी मिळतीजुळती आहेत. या शिवलिंगाची रचना केवळ सौंदर्यासाठी नाही, तर त्यामागे वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्टिकोनही असावा. शिवाला बेल अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे शिवाची 108 नावे घेऊन स्वतंत्रपणे बेल अर्पण करण्यासाठी ही रचना केली असावी.
मुख्य शिवलिंगावर व 108 शिवलिंगांवर अभिषेक केल्यानंतर ते पाणी एकत्रितपणे वाहून जाण्यासाठी अत्यंत प्रगत अशी ‘पन्हाळी’ तयार करण्यात आली आहे. हे त्या काळातील स्थापत्यशास्त्राच्या प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे असे म्हणता येईल. स्थापत्यशैली आणि उपलब्ध संदर्भांनुसार, हे शिवमंदिर आणि शिवलिंग साधारणपणे 11 व्या किंवा 12 व्या शतकातील असावे असे मानले जाते. हा काळ या भागात चालुक्य किंवा यादव राजांच्या सत्तेचा होता, ज्यांनी कलेला आणि मंदिरांना मोठे राजाश्रय दिले होते. त्या काळात मांजरा नदीच्या विस्तीर्ण पात्रात आणि निसर्गरम्य परिसरात असलेले हे छोटेसे मंदिर आज दुर्लक्षित अवस्थेत आहे. या अद्वितीय वारशाचे ‘संवर्धन आणि जतन’ करणे ही काळाची गरज आहे.


























































