संस्कृतायन – ऋतूसंहाराचा साजरा सोहळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

<<डाॅ. समिरा गुजर जोशी>>

[email protected]

सृष्टी मुक्तहस्ताने दान देत असताना ते दान स्वीकारण्याची पात्रता आणि रसिकता ठायी असणाऱया महाकवी कालिदासांनी, वर्षा ऋतूचे साजरेपण ऋतुसंहार या कलाकृतीतून अगदी साध्या शब्दांत व्यक्त केले आहे. त्यांनी रचलेली ही शब्दचित्रं निसर्गाचे नितळ सौंदर्य दर्शवितात.

मागच्या लेखात आपण पाहिले की, पावसाळ्याचे आगमन झाल्यानंतर कसे चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचे अतिशय सुंदर वर्णन कालिदास करतो, पण त्यातली सगळ्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे पावसाळ्यातील पुष्पवैभव. ‘फुलांचा ऋतू’ असं म्हटलं की, आपल्याला स्वाभाविकपणे वसंत आठवतो, पण कालिदास आपल्याला वर्षा ऋतूत फुलणाऱया फुलांची नव्याने ओळख करून देतो आणि मग लक्षात येते की, कासचे फुलणारे पठार ही पावसाळ्याचीच तर देणगी आहे.

कालिदासाच्या साहित्यातील स्त्रिया या ऋतूला अनुसरून शृंगार करतात. निसर्गात जर ताजी फुलं फुलली आहेत तर अशा वेळी उगीच रत्नांचे दागिने घालून मिरवण्याच्या अरसिकपणा त्या करत नाहीत. शिवाय त्या हुशार आहेत. हवेत गारवा आला आहे. अशा वेळी धातूचे दागिने घालू नयेत हे त्यांना बरोबर ठाऊक आहे. त्यापेक्षा फुलांच्या दागिन्यांत सौंदर्य अधिक खुलतं आणि मुसळधार पावसात भिजण्याचा मोह झाला तरी पटकन धावत जाऊन तो पाऊस झेलता येतो. सृष्टी मुक्तहस्ताने दान देत असताना ते दान स्वीकारण्याची पात्रता आणि रसिकता त्यांच्या ठायी आहे. म्हणून तर कालिदास वर्णन करतो – वर्षा ऋतूत  स्त्रिया केसांत  कदंब, बकुळ, केवडा या फुलांचे गजरे माळतात, ककुभ वृक्षाच्या तुऱयांनी बनविलेली कानाला योग्य कर्णभूषणे  धारण करतात. आज आपल्याला यातील अनेक फुलांची ओळखही नसेल, पण जरा आजूबाजूला पाहिलं तर बहुतेक यातले अनेक वृक्ष आजही आपल्या अवतीभवती फुलत असतात, आपण त्यांची दखल घेतलेली नसते इतकेच. हा कदंब वृक्षच घ्या. कृष्णाचाही हा लाडका वृक्ष. त्याला येणारी फुलं पिवळ्या, नारंगी काटेरी चेंडूसारखी  असतात. अतिशय छान दिसणारी ही फुलं तितकीच सुवासिक असतात. मुंबईतही अनेक ठिकाणी हे फुलांचे चेंडू सहज आढळतील. त्यांचे गजरे ही कल्पना विलक्षण आहे. नव्याची ओढ असणाऱया अलीकडच्या वधूंनी हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. बकुळ आणि केवडा अजून तरी आपल्या परिचयाचे आहेत. ककुभ वृक्ष म्हणजे अर्जुन वृक्ष. त्याची फुले लोंबकळणाऱया घोसासारखी असतात. कानावरून ते घोस सोडले की, फार सुंदर दिसत असतील यात शंका नाही. यापुढच्या श्लोकात तर निसर्ग एक पात्र, एक व्यक्तिरेखा झाला आहे. पाऊस आला, उन्हाळ्याची पीडा दूर झाली. पावसाच्या सरीत भिजून सुखावलेली वनराणी जणू केवडय़ाच्या कळ्यांमधून हसते आहे. आसमंत कदंब, जाती फुलांनी आनंदित होऊन वाऱयाने हलणाऱया फांद्या व शाखांनी जणू नाच करीत आहे. हा मेघयुक्त पर्जन्यकाळ एखादा पती (आपल्या) तरुण पत्नीला सजवितो त्याप्रमाणे सृष्टीच्या केसात जुईच्या कळ्या, नवीन उमललेली फुले व चमेलीसह बकुळीचा गजरा माळून, कानांत नवीन फुललेली कदंबसुमनांची कर्णभूषणे चढवून तिला सजवत आहे.

वर्षा ऋतूचे साक्षेपी वर्णन करताना कालिदास लिहितो –

बहुगुणरमणीयो योषितां चित्तहारी तरुविटपलतानां बान्धवो निर्विकारः ।

जलदसमय एष प्राणिनां प्राणभूतो दिशतु तव हितानि प्रायशो वाञ्छितानि ।।

(अनेक गुणांनी युक्त असणारा, स्त्रियांचे चित्त हरण करणारा, वृक्ष – लता – वेलींचा निस्पृह सखा असणारा, आपल्या सगळ्यांचा प्राणभूत असणारा असा हा जलद समय आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करो.)

कालिदासाने आषाढाच्या पहिल्या दिवसाला जागतिक साहित्यात अजरामर केले. पावसाळा आणि मेघदूत यांचे अतूट नाते आहे. तुलनेने ‘ऋतुसंहार’ या काव्यात कालिदास काहीसा नवखा आहे. ही त्याची पहिली कृती मानली जाते. ‘मेघदूता’त त्याची प्रगल्भता नजरेत भरते. यक्षाला तो पहिला मेघ दिसतो तो कसा, तर हत्तीचे एक छोटे पिल्लू जणू पर्वताला ढुशा देत आहे. या कल्पनेतले सौंदर्य वेगळे विशद करण्याची गरज नाही. आकाशात ढग दाटून आले की, मनात जी एक अनामिक हुरहुर निर्माण होते तिला उद्देशून कालिदास लिहितो – मेघालोके भवति सुखीनोपि अन्यथावृत्तीचेत (एखादा सुखी गृहस्थ जो आपल्या प्रियजनांसमवेत आहे, तोही अस्वस्थ होतो.) मग जो विरहात आहे त्याची अवस्थता काय विचारता! कल्पनेची ही श्रीमंती कदाचित ‘ऋतुसंहार’मध्ये नाही, पण निसर्गाचे काही snap shots नक्कीच आहेत, पण ही शब्दचित्रे अतिशय खरी आहेत. ती फार सजवलेली नाहीत यातच त्यांचे सौंदर्य दडले आहे.

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङ्मयाच्या अभ्यासक आहेत.)