
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
अमुद्रोपि वरं कूप समुद्रेणापि तेन किम् । सुखादु सलिलं यत्र पीयते पथिकैः पथि ।।
सर्व नद्या आणि जलप्रवाह ज्याच्यात येऊन मिळतात असा विशाल समुद्र असला तरी त्याचा काय उपयोग?
कारण मार्गात प्रवाशांना सहज, गोड आणि पिण्यायोग्य पाणी ज्या साध्या विहिरीत मिळते, ती विहीरच अधिक श्रेष्ठ ठरते.
समुद्र या शब्दाच्या व्युत्पत्तीमुळे या अन्योक्तीचा आशय अधिक प्रभावी होतो. समुद्र म्हणजे सर्व जलसंपत्तीचे अंतिम संकलनस्थान; विविध नद्या तिथे एकवटतात तरीही त्याचे पाणी तहान भागवू शकत नाही. उलट, आकाराने लहान असलेली विहीर प्रत्यक्ष उपयोगी पडते. कवी येथे सांगतो की केवळ संग्रह, वैभव किंवा विशालता यांना महत्त्व नसून, इतरांच्या उपयोगी पडणे हेच खरे श्रेष्ठत्व आहे. माणसाच्या धनाला आणि ज्ञानालाही हे लागू पडते.
प्रचंड श्रीमंती किंवा विद्वत्ता असून जर ती समाजोपयोगी नसेल तर तिचा काय उपयोग? पण थोडे धन वा ज्ञान असले तरी ते लोकांच्या कल्याणासाठी वापरले तर ते अधिक महत्त्वाचे ठरते.




















































