निमित्त – मायक्रोप्लास्टिक शोधणारे ‘प्लास-स्टिक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ओमकार संकपाळ

[email protected]

पर्यावरणातील नवकल्पनांसाठी दिला जाणारा अर्थ प्राईज हा पुरस्कार यंदा हिंदुस्थानातील तीन विद्यार्थ्यांनी पटकावला आहे. पाण्यातील  मायक्रोप्लास्टिक प्रदूषण कमी करणारे त्यांचे संशोधन अनोखे आहे.

आजच्या धावपळीच्या जगात जसजसा झपाटय़ाने विकास होत आहे, त्याचपद्धतीने प्रदूषणही मोठय़ा प्रमाणात वाढत चालले आहे. दिवसेंदिवस यात कमालीची वाढ होत आहे. प्रदूषणाची वाढती समस्या पुढच्या पिढय़ांसाठी एक मोठे आव्हान असणार यात तीळमात्र शंका नाही. यावर मात करण्यासाठी विविध स्तरांवर नाना प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत. याचा अवलंब किती प्रमाणात होतो हे सर्वश्रुत आहे. मात्र पिण्याच्या पाण्यातील प्रदूषणाबद्दल वाटत असलेल्या चिंतेमुळे हिंदुस्थानातील तीन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. चिंचेच्या बियांपासून मायक्रोप्लास्टिक फिल्टरचे अनोखे संशोधन करणाऱया या त्रिकुटाने ‘द अर्थ प्राईज 2026’ हा किताब पटकावला आहे.

पर्यावरणातील नवकल्पनांसाठी अर्थ प्राईज हा पुरस्कार दिला जातो. 16 वर्षीय विवान छावछारिया, अरियाना अग्रवाल आणि अव्यना मेहता या तिघांना ‘द अर्थ प्राईज 2026’ मध्ये आशियातील विजेते घोषित करण्यात आले. त्यांनी ‘प्लास-स्टिक’ (Plas-Stick) नावाची जैवविघटनशील पावडर विकसित केली आहे. चिंचेच्या बियांच्या पावडरचा वापर करून पाण्यातील मायक्रोप्लास्टिक काढून टाकण्यासाठी या शोधाचा वापर होणार आहे. ग्रामीण भागात बहुतांश करून आधुनिक पाणी शुद्धीकरण प्रणाली उपलब्ध नसते. मोठय़ा टाक्यांमध्ये हे पिण्याचे पाणी साठवले जाते. ग्रामीण भागातील एका प्रकल्पादरम्यान पिण्याच्या पाण्याचा वापर होत असताना, पाण्यात वाढत चाललेल्या अदृश्य मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाच्या समस्येकडे विद्यार्थ्यांचे लक्ष गेले आणि इथूनच सुरू झाला मायक्रोप्लास्टिक फिल्टरचा प्रवास.

‘प्लास-स्टिक’ कसे कार्य करते?

चिंचेच्या बियांच्या उरलेल्या कचऱयापासून तयार केलेली जैवविघटनशील पावडर म्हणजे ‘प्लास-स्टिक’ होय. ही पावडर दूषित पाण्यात टाकल्यावर ती मायक्रोप्लास्टिकच्या कणांना आकर्षित करते. त्यांना एकत्रित करून एक गोळा तयार होण्यास मदत होते. त्यानंतर हा गोळा हातात सहज पकडता येणाऱया चुंबकाच्या मदतीने काढून टाकता येतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱया पदार्थांपासून हा उपाय केला जातो. यासाठी वीज किंवा महागडी यंत्रणा आवश्यक नाही. त्यामुळे ग्रामीण आणि कमी साधनसंपत्ती असलेल्या भागांसाठी हा उपाय उपयुक्त ठरू शकतो असे विद्यार्थ्यांना वाटते.

आसाममधील भारतीय तंत्रज्ञान संस्था, गुवाहाटी अर्थात आयआयटी गुवाहाटीमधील तज्ञांसोबतही या प्रकल्पाच्या विकासादरम्यान विद्यार्थ्यांनी काम केले आहे.

मायक्रोप्लास्टिक म्हणजे अतिशय सूक्ष्म प्लॅस्टिक कण, ज्यांचा आकार साधारणपणे पाच मिलिमीटरपेक्षा कमी असतो. हे कण मोठय़ा प्लॅस्टिक वस्तूंचे विघटन, कृत्रिम कपडय़ांतील तंतू, औद्योगिक कचरा आणि पॅकेजिंग साहित्य यांमधून तयार होतात. अभ्यासांमध्ये पिण्याचे पाणी, मानवी रक्त, फुप्फुसे आणि अगदी मेंदूच्या पेशींमध्येही मायक्रोप्लास्टिक आढळल्याचे समोर आले आहे. याबाबत अद्याप अभ्यास सुरू असला तरी अनेक वैज्ञानिक मायक्रोप्लास्टिक प्रदूषणाला भविष्यातील एक मोठी समस्या मानतात. यावरून मायक्रोप्लास्टिकचे गांभीर्य लक्षात येते.

12,500 डॉलर्सचे क्षेत्रीय पारितोषिक

द अर्थ प्राईज संस्थेच्या मते, ‘द अर्थ प्राईज’ ही स्पर्धा 13 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी जगातील सर्वात मोठी पर्यावरणविषयक स्पर्धा आहे. या स्पर्धेतील विजेत्या संपूर्ण टीमला एकत्रित 12,500 डॉलर्सचे क्षेत्रीय पारितोषिक दिले जाते.

आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमावणाऱया ‘प्लास-स्टिक’ प्रकल्पावर आणखी काम सुरू आहे. प्रकल्पाची मोठय़ा प्रमाणावर स्वतंत्र वैज्ञानिक चाचणी झालेली नाही. हा उपाय व्यापक स्तरावर वापरण्यापूर्वी अधिक तपासणी आवश्यक असेल. या प्रकल्पातील सर्वात विशेष बाब म्हणजे चिंचेच्या बियांच्या कचऱयाचा वापर. चिंचेच्या बियांमध्ये नैसर्गिक असे गुण असतात, जे पाण्यातील कणांना गोळा करून ठेवू शकतात. कोणताही मोठा खर्च न करता स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध संसाधनांचा उपयोग पर्यावरणीय नवकल्पनांसाठी कसा होऊ शकतो हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.