
>> राहुल गोखले
[email protected]
‘व्यंकटेश सुप्रभातम’, ‘भज गोविंदम‘ किंवा ‘विष्णू सहस्त्रनाम’ अशा स्तोत्र-भजनांचा उल्लेख होताच, आपल्या दैवी आवाजाने त्यांना एका अलौकिक उंचीवर नेऊन ठेवणाऱया एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. कर्नाटक संगीतविश्वात अत्यंत आदराने नाव घेतल्या जाणाऱया सुब्बुलक्ष्मी यांचे लेखक सुनील परांजपे यांनी लिहिलेले विस्तृत चरित्र ‘सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी’.
देवदासी कुटुंबात सुब्बुलक्ष्मी यांचा झालेला जन्म, उत्तम वीणा वादक असलेल्या त्यांच्या आईचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव, लहानपणी एका वृद्धाने सुब्बुलक्ष्मी यांना शिकवलेले संस्कृत श्लोक; त्यांचा बालपणापासूनच संगीताकडे असलेला ओढा, श्रीनिवास अय्यंगार यांच्याकडे घेतलेले गायनाचे धडे; असे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे लेखक टिपतो. पुढे सुब्बुलक्ष्मी या थोर गायक सेम्मंगुडी श्रीनिवास अय्यर यांच्या शिष्या बनल्या या प्रवासाचा वेध लेखक या घेतो.
लेखकाने पुरंदरदास, त्यागराज, एम. एल. वसंतकुमारी अशा कर्नाटक संगीतात योगदान देणाऱया विभूतींच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेत सुब्बुलक्ष्मी या महान परंपरेचा भाग कशा ठरल्या याकडे लक्ष वेधले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी पहिली मैफिल, वयाच्या पंधराव्या-सोळाव्या वर्षी पहिली ग्रामोफोन रेकॉर्ड असे महत्त्वाचे टप्पे पार पाडत सुब्बुलक्ष्मी संगीत विश्वात आपले अढळ स्थान निर्माण करत होत्या. याचा वेध घेतानाच लेखक सुब्बुलक्ष्मी यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱया प्रसंगांचे वर्णन करतो. त्यांच्या आईने त्यांचा विवाह एका श्रीमंत कुटुंबातील अनुरूप तरुणाशी ठरवला होता. मात्र, संगीताकडे ओढा असल्याने सुब्बुलक्ष्मी यांनी घरातून निघून जात टी. सदाशिवम यांच्याकडे आश्रय घेतला. सदाशिवम हे विवाहित असल्याने समाजातून उलटसुलट प्रवाद निर्माण झाले. तरीही, दोघांमध्ये निर्माण झालेली आत्मीयता, वयातील 14 वर्षांचे अंतर असूनही पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सदाशिवम यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्याशी बांधलेली लग्नाची गाठ, सदाशिवम यांच्या पहिल्या पत्नीच्या दोन्ही मुलींना सुब्बुलक्ष्मी यांनी वात्सल्याने सांभाळणे हा प्रवास लेखक वर्णन करतो.
सुब्बुलक्ष्मी यांना चित्रपटांत काम करण्याची मिळालेली संधी किंवा केवळ एक नायिका म्हणून मिळणाऱया लोकप्रियतेपेक्षा, ‘सावित्री’, ‘शकुंतला’ आणि ‘मीरा’ यांसारख्या चित्रपटांतून भक्तिमय भूमिका वठवून मिळालेली अमाप लोकप्रियता अधिक श्रेष्ठ ठरली. याचे श्रेय सदाशिवम यांच्या दूरदृष्टीला जाते. कर्नाटक संगीतासोबतच सुब्बुलक्ष्मी यांनी हिंदुस्थानी शास्त्राrय संगीताचे पंडित नारायणराव व्यास यांच्याकडे घेतलेले धडे आणि त्यांच्या बहुआयामी गायकीतील विविध पैलूंचे रोचक वर्णन लेखक करतो. सुब्बुलक्ष्मी यांनी जगभरात केलेले दौरे; कांची मठाच्या परमाचार्यांनी रचलेले व वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘मैत्रीं भजत’ या संस्कृत श्लोकाला सुब्बुलक्ष्मी यांनी दिलेला स्वर, रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱया त्यांच्या मैफिली, त्यांच्या ग्रामोफोन रेकॉर्डसपासून ते सीडीपर्यंतच्या विक्रीने केलेले विक्रम तसेच ‘रॅमन मॅगसेसे’ पुरस्कारापासून ‘भारतरत्न’पर्यंतच्या अनेक मानाच्या टप्प्यांचा आलेख मांडतानाच लेखकाने सुब्बुलक्ष्मी यांच्या सामाजिक बांधिलकीचाही वेध घेतला आहे. ‘कस्तुरबा गांधी मेमोरियल ट्रस्ट’, ‘नेहरू मेमोरियल’साठी निधी उभारणीनिमित्त त्यांनी केलेले प्रयोग, मद्रास ऑल इंडिया रेडिओवर एका रात्रीत गांधीजींचे आवडते भजन सुब्बुलक्ष्मी यांनी मुद्रित करून गांधीजींच्या वाढदिवसाला ते प्रसारित करण्यात आले असे हृदयस्पर्शी प्रसंग पुस्तकाची खुमारी वाढवतात.
‘कलेला भाषांचे कुंपण नसते’ हे दाखवून देताना सुब्बुलक्ष्मींचे संत तुकारामांचे अभंग गाणे किंवा मिरज येथून आलेले तंबोरे विशेष पसंत असणे असे मराठी मातीशी त्यांच्या निकटतेचे उल्लेख येतात. स्वातंत्र्यवीर सावकरांवर त्यांच्या पतीची असणारी निष्ठा किंवा मयूरपंखी निळ्या रंगाला सुब्बुलक्ष्मी यांच्या नावाच्या आद्याक्षरांवरून मिळालेले ‘एम. एस. ब्लू’ हे नाव, अशी माहिती पुस्तकाची रंजकता वाढवते. काही माहिती टाळली असती तर पुस्तक आटोपशीर झाले असते. चिन्मय पंडित यांनी केलेले मुखपृष्ठ प्रसन्न आहे.
सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी
लेखक ः सुनील परांजपे
प्रकाशक ः हेडविग मीडिया हाऊस, मुंबई
पृष्ठे ः 185
किंमत ः 330 रुपये




















































