नोंद – वेगळा भटक्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रविप्रकाश कुलकर्णी

भटके आणि त्याची भ्रमंती हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यातदेखील प्रकार आहेत. अशा भटक्यांमधील प्रवीण कारखानीस या भटक्याचं वेगळेपण म्हणजे देशपरदेशाच्या प्रवासाबरोबरच लगेच ते प्रवास वर्णन तर लिहीत पण त्यात नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी देत असत. मग त्यात कधी हकीकत असेल, तर कधी किस्सा! अशा या भटक्याची भ्रमंती निसर्गनियमानुसार 22 मे 2026रोजी वयाच्या 79व्या वर्षी थांबली.

प्रवीण कारखानीस हे नाव एकदम प्रकाशात आलं ते त्यानी मुंबई ते रोम प्रवास दुचाकीवरून केला तेव्हा! आज प्रवासाच्या सेवासुविधांचा सुकाळ असतानाही आजही असा प्रवास साधा सोपा नाही. अशावेळी 1977 च्या काळात हे केवढे साहस असेल, नाही का? याबाबत प्रवीण यांचं झपाटलेपण कुतूहल वाढवते.

मुबंई-रोम प्रवास येझदी मोटार सायकलवरून करताना त्याना पाकिस्तानमार्गै खैबरखिंडीतून पुढे इराणमध्ये जायचं होतं. यासाठी पाकिस्तानचा फक्त चोविस तासांचा ट्रांझिस्ट व्हिसा हवा होता. पण पाकिस्तान दूतावासाकडून त्यांना सतत नकार मिळत राहीला. शेवटी कारखानीस यांनी काय केलं? झुल्फीकार अली भुत्तो सिमला करारासाठी आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मुलगी बेनझीर भुत्तोs यादेखील होत्या. प्रसारमाध्यमांनी बेनझीर यांचे जरा जास्तच कौतुक केले होते. तो धागा पकडून प्रवीण कारखानीस यांनी थेट त्यांनाच मदत करण्यासाठी पत्र लिहिलं! पुढे काही दिवसांनी कारखानीस यांना थेट पत्र आलं- ‘फ्रॉम दि हाऊस ऑफ प्राइम मिनीस्टर, रावळपिंडी, पाकिस्तान.’ ते पत्र होतं बेनझीर यांच्या अम्मीजान, बेगम नूसरत भुत्तो यांचे!

बेनझीर ऑक्सफर्डला उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या. त्यामुळे कारखानीस यांच्या पत्राची दखल त्यांच्या आईनेच घेतली. त्यांनी कारखानीस यांना शुभेच्छा देऊन म्हटले होते की, त्यांनी दिल्लीला पाक दूतावासात जाऊन हे पत्र दाखवावं. त्यांचं काम होऊन जाईल. मात्र तरीही कारखानीस यांना तो व्हिसा मिळाला नाहीच. पण कारखानीस किती टोकाची धडपड करू शकत त्याचेच हे एक उदाहरण.

पुढे अनेक वर्षांनी मार्च 2004 मध्ये भारत-पाक दरम्यान क्रिकेटचे चार सामने ठरले. तेव्हा कारखानीस यांनी पुन्हा धावपळ करून क्रिकेटचे निमित्त करून एकदाचं पाकिस्तान दर्शन जमवून आणले. एवढेच नव्हे तर पंधरा दिवसांच्या विशेष क्रिकेट व्हिसावर त्यांनी सामने पाहिले आणि जमेल तेवढे पाकिस्तान दर्शनही केले. त्यांच्या या अनुभवावर ‘मंजिल-ए-मक्सूद पाकिस्तान’ हे फर्मास पुस्तक त्यांनी लिहीले.

एरव्ही आपण अमृतसरला गेलो की भारताची वाघा बॉर्डर पाहायला जातोच. पण हा शब्दप्रयोग चूक असून कटरा बॉर्डर म्हणायला हवं, असा मतप्रवाह आहे. कारण वाघा बॉर्डर पाकिस्तानची आहे. यासाठी कारखानीस यांनी पंजाब सरकारपासून पार मध्यवर्ती सरकारपर्यंत पाठपुरावा केला. अखेर ते मान्यही झाले पण अजून आपण वाघा बॉर्डरच म्हणतो.

अशा दुर्मिळ आठवणी कारखानीस यांच्या, ‘हावडा ब्रिजवरून’, ‘अष्टचक्री रोमायण’, ‘भ्रमंती देश विदेशाची’ अशा वेगवेगळ्या पुस्तकात आहेत. ‘जे जे आपणांसी ठावे ते ते सर्वासी सांगावे’ हा त्यांचा स्वभावधर्म होता.
असे भटके कारखानीस हमखास भेटायचे ते साहित्य संमेलनात. तसे सातारातील 99व्या संमेलनात मला ते भेटले. 100व्या संमेलनात भेटूच असं ठरलं. संमेलन होईलच पण आता कारखानीस नसणार आणि तेव्हा या भटक्या स्नेह्याची प्रकर्षाने आठवण येणार.