परीक्षण – मानसिक विभ्रमांचे प्रत्ययकारी चित्रण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> श्रीकांत आंब्रे

प्रमोद काळे यांचा ‘ऐल ना पैल’ हा त्यांच्या वयाच्या 70 व्या वर्षी प्रकाशित झालेला पहिलाच कथासंग्रह. शब्दांवर विलक्षण हुकूमत असणाऱया या लेखकाच्या कथा प्रामुख्याने वरवर सुखवस्तू वाटणाऱया मध्यमवर्गीय जीवनातील अनुभवांवर आधारित असल्या तरी त्यातील भावनिक पदर नात्यांची गुंफण, परस्परांना समजावून घेण्याची मानसिकता, त्यासाठी सारे काही सहन करण्याची वृत्ती यांचा एक सुयोग्य मेळ या कथांमध्ये दिसतो. पती-पत्नींमधल्या इतरांना न समजणाऱया गूढ दांपत्य जीवनापासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या रहस्यकथांपर्यंत कुठलाच विषय या कथांना वर्ज्य नाही. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. प्रत्येक कथेचा पोत वेगळा आणि बाज वेगळा. काही अतर्क्य घटनांवर आधारलेल्या, तर काही कल्पनाशक्तीची परिसीमा गाठणाऱ्या. मात्र यातील नात्यांचे बंध इतके परिपक्व असतात की, ते एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. ‘ऐल ना पैल’ हे शीर्षकही त्यादृष्टीने समर्पक आहे. प्रारंभीच्या ओळीच त्याविषयी खूप काही सांगून जातात.

मधेच असली नदी जरा,
तर ऐल पैलचे येते नाते;
नदीच पुसुनी कुणी टाकली,
ऐलही येथे पैलही येथे…

संग्रहातील कथांमधील माणसांचे जीवनही असेच आहे. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी ‘गे’ ही संकल्पना आतासारखी सर्वदूर रुळलेली नव्हती. ‘सहेला रे…’ या कथेतील विद्यापीठात मराठी विभागप्रमुख असलेल्या पतीच्या समलैंगिकतेच्या ओढीची माहिती त्याने स्वतः देऊनही त्याचा तिटकारा न करणारी, त्याला समजून घेत त्याच्या विद्वत्तेचा, रसिकतेचा आदर करणारी वीणासारखी पत्नी मर्यादांचे उल्लंघन करीत नाही, तर नेमकी त्याविरुद्ध पुण्यात एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याला ठार मारणाऱया कोयता गँगच्या अंगावर धावून जाणारी, त्यातील एका गुंड नेत्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करणारी सरिता मानसिक रोगाची शिकार कशी होते, ही सारी कहाणी मन हेलावणारी. नियतीच्या चक्रात माणूस अडकला की, होणारे भास-आभास दृष्टिभ्रमाच्या पलीकडे कसे घेऊन जातात हे ‘फिकट निळं इन्व्हलप’ या कथेत दिसतं. ‘समांतर विश्व’ या शास्त्राrय आणि तत्त्वज्ञानातील संकल्पनेवर आधारित ‘पर्दाफाश’ ही कथाही एका वेगळय़ाच अनुभूतीतून आकार घेते. कधी कुणाच्या रूपाने कुणीतरी आपल्याला सावध करीत असते, पण ते समजून घेण्याची पात्रता आपल्यात नसते हे ‘मुखवटा’ या कथेत प्रत्ययाला येते. अनुराधा आणि अनिरुद्ध यांच्या वैवाहिक जीवनातील ‘एक अशास्त्राrय काल्पनिका’ हा तर भन्नाट अनुभव आहे. सिंधुदुर्गातील कासवली गावातील दिग्या शांताराम धुरीचा साक्षात्कारी बाबा कसा होतो, याची मजेशीर मालवणी थाटाची ‘अणुरणिया थोकडा’ ही कथा आजच्या ढोंगी बुवांच्या पार्श्वभूमीवर अतिशय रंजक असलेली. ‘बिन्नी’ ही कथा निरागस मांजरप्रेमाची. ‘आन (इम) परफेक्ट स्टोरी’ ही तीन भागांतील उत्कंठावर्धक रहस्यकथा म्हणजे लेखकाच्या कल्पनाशक्तीचा उच्चांकच आहे. ती प्रत्यक्षातच वाचायला हवी.

वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी लेखकाला मनात साचलेल्या विविध व्यक्तिरेखांना, प्रसंगांना कथारूपातून व्यक्त करावेसे वाटू लागले. त्यांची मानसिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती, त्यानुसार घडत गेलेले त्यांचे स्वभाव, वागण्या-बोलण्याच्या सवयी, आयुष्यात घडणाऱया तार्किक – अतार्किक घटना या सगळय़ा गोष्टी भुरळ घालू लागल्या आणि त्यांची कथा जन्मास आली.

या सर्व कथांमधून लेखकाची जीवनाविषयी असलेली श्रद्धा, नियतीच्या चक्रापुढे माणसाची हतबलता, मानसिक दुर्बलतेचा पगडा प्रामुख्याने दिसतो. मात्र या सर्व कथांमधील स्त्रिया खंबीर मनाच्या आहेत. नैतिकतेची सीमारेखा ओलांडतानाही त्या ठाम असतात. सुखासीन आयुष्य जगताना त्यातील ताण-तणावांना त्या धीटपणे सामोऱया जातात. लेखक नाटय़ दिग्दर्शक असले तरी कोणत्याही कथेचा घाट आखीव-रेखीव वाटत नाही. प्रत्येक कथा आपसुक फुलत जाते. अगदी सहजपणे. मानसोपचार हा घटक काही कथांना व्यापून राहतो तो मनाच्या तळाचा शोध घेण्यासाठी. म्हणूनच या कथांमधील व्यक्तिरेखांची मानसिक आंदोलने लक्षवेधक ठरतात. शब्दसामर्थ्याची यथार्थ जाण असलेला हा लेखक हळवे प्रसंगही तरलतेने रंगवतो. त्यांच्या ग्रामीण बोलीतील ‘झिप्रूची गोष्ट’ म्हणूनच मनात घर करून राहते. पहिल्याच कथासंग्रहात कुठेही नवखेपणाच्या खुणा नाहीत. सराईत लेखकासारखे प्रवाही लेखन आहे. अनुभवाचा इतका खजिना जवळ असताना यापूर्वीच त्यांचे अनेक कथासंग्रह यायला हवे होते. कथासंग्रहाला साजेसे अन्वर हुसेन यांचे मुखपृष्ठही बोलके आहे.

ऐल ना पैल
लेखक ः प्रमोद काळे
प्रकाशन ः उन्मेष प्रकाशन, पुणे
पृष्ठे ः 167
किंमत ः 250 रुपये