
जगभरातील पुस्तकविश्वात मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बुकर पुरस्कारांकडे साहित्य आणि समस्त वाचक, लेखकवर्गाचे लक्ष असते. द बुकर प्राइज, द इंटरनॅशनल बुकर प्राइज आणि द चिल्ड्रन्स बुकर प्राइज असे तीन वेगवेगळ्या विभागात पुरस्कार दिले जातात. नुकतीच द इंटरनॅशनल बुकर प्राइजची घोषणा करण्यात आली. द इंटरनॅशनल बुकर पुरस्कार जगभरातील इतर भाषांमधून इंग्रजीत अनुवादित झालेल्या साहित्यासाठी दिला जातो. महत्त्वाचे म्हणजे हा पुरस्कार संयुक्तपणे लेखक व अनुवादकाला दिला जातो. 2026 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार तैवानच्या लेखिका यांग शुवांग-जी यांच्या ‘ताइवान ट्रव्हलॉग’ (Taiwan Travelogue) या कादंबरीला प्राप्त झाला आहे. या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर लिन किंग यांनी केले असून, मॅण्डरिन चिनी भाषेतून इंग्रजीत अनुवादित होऊन बुकर पुरस्कार जिंकणारे ‘ताइवान ट्रव्हलॉग’ हे पहिलेच पुस्तक ठरले आहे. यंदाच्या लघु यादीत निवड झालेली सहाही पुस्तके भू-राजकीय इतिहास, सत्ताकारण, सामाजिक विषमता यांचा उहापोह करीत शतकभरातील घडामोडींवर प्रकाश टाकणारी होती. यात भारतीय-कॅनेडियन लेखिका आणि अनुवादिका पद्मा विश्वनाथन यांनी अॅना पॉला माया यांच्या ‘ऑन अर्थ अॅज इट इज बिनीथ’ या मूळ पोर्तुगीज भाषेत लिहिलेल्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचाही समावेश होता.




















































