ऊसतोड मजूर कुटुंबाचे पांग फिटले, चार सख्ख्या बहिणी एकाचवेळी पोलीस दलात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्हा हा ऊसतोड मजूर म्हणून ओळखला जातो. बीड जिह्यातील केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील ऊसतोड मजूर असलेल्या हनुमंत चौरे यांच्या चार मुली एकाच वेळी पोलीस दलात भरती झाल्या आहेत. चार सख्ख्या बहिणींची पोलीस दलात निवड झाल्याने ऊसतोड मजूर कुटुंबाचे मुलींनी खऱ्या अर्थाने पांग फेडले आहे.

हनुमंत चौरे आणि त्यांची पत्नी हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून ऊसतोड मजूर म्हणून कष्ट करतात. परिस्थिती बिकट असूनही त्यांनी आपल्या चारही मुलींना शिक्षण दिले. मुली शिकल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, असे हनुमंत यांना वाटत होते. त्यांच्या मुली उषा, अर्चना, शीतल आणि गीतांजली या चौघींनी आई-वडिलांचे कष्ट वाया जाऊ दिले नाही. या चौघींनीही संघर्ष, जिद्द आणि कठोर कष्टाच्या जोरावर नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र पोलीस भरतीत स्थान मिळवले आहे. या चौघींनीही अहोरात्र घेतलेली मेहनत आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे करून दाखवले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आम्ही आयुष्यभर कष्ट केले. परंतु, मुलींना शिकवण्याचा निर्धार सोडला नाही. आज आमच्या चारही मुली पोलीस दलात दाखल झाल्या आहेत. यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही, अशी प्रतिक्रिया आई-वडिलांनी दिली.