
जिवंत असताना माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार असतो, पण मृत्यूनंतरही त्याच्या पार्थिवाला सन्मान मिळायलाच हवा. मात्र, जालना जिल्ह्यातील परतूर शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने माणुसकीलाच काळिमा फासला आहे. बेपत्ता असलेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडल्यानंतर तो शववाहिनीऐवजी चक्क नगरपालिकेच्या कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयात नेण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे.
हिरालालनगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ बेपत्ता असलेले सुरेश ढाकरगे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या पत्नी उषा ढाकरगे यांनी दोन दिवसांपूर्वी पती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. पाण्याच्या टाकीजवळ त्यांची दुचाकी आढळली आणि त्यानंतर शोधमोहिमेत मृतदेह सापडला. परंतु, या घटनेपेक्षाही अधिक वेदनादायी बाब म्हणजे, पंचनामा झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यासाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्याऐवजी तो नगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडीत ठेवून रुग्णालयात हलविण्यात आला. शहरात दोन रुग्णवाहिका आणि शववाहिनी उपलब्ध असतानाही मृत व्यक्तीच्या पार्थिवाची अशी विटंबना होणे, हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि असंवेदनशीलतेचे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड यांच्याकडे निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.



























































