
>> बद्रीनाथ खंडागळे
मृग नक्षत्राचा पहिला दिवस दरवर्षी अघोषित ‘फिश डे’ म्हणूनच पाळला जातो. या पर्वावर मत्स्याहार केल्यास ‘फिटनेस’ वर्षभर टिकतो. तसेच दमा व श्वसनरोगींच्या प्रकृतीत सुधारणा होऊन दिलासा मिळतो. असा समज आहे. त्यामुळे ७ जूनच्या मुहूर्तावर पैठणच्या मासळी बाजारात तुफान गर्दी पाहायला मिळणार आहे. यंदा विविध प्रकारच्या ३० टन माशांची विक्री होण्याचा अंदाज असून तसा साठाही मत्स्य व्यवसायिकांनी करून ठेवला आहे!
हैदराबाद येथे दर ७ जून रोजी देशभरातून आलेल्या दम्याच्या रुग्णांवर मत्स्योपचार केला जातो. अनेक वर्षांपासून होत असलेल्या या अनोख्या उपचारावर रुग्णांचा विशेषतः श्वासविकारांच्या रुग्णांचा गाढ विश्वास आहे. तेथे श्वसनरोग असलेल्या रुग्णांना जिवंत मासा गिळायला दिला जातो. छत्रपती संभाजीनगर येथेही हा उपचार केला जातो. या पार्श्वभूमीवर गेल्या २० वर्षांपासून मृग नक्षत्राचा पहिला दिवस व मासे खाणे हे समिकरणच रुढ होत गेले आहे. एवढेच नव्हे तर कोरोना काळानंतर हा समज आणखी दृढ होत गेला. व त्याला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. ७जून हा दिवस चक्क अघोषित ‘फिश डे’ म्हणून पाळला जात आहे!
पैठणच्या मच्छीमार्केटमध्ये ठोक आणि किरकोळ मासे विक्री करणारे रवीद्र पल्हारे यांनी सांगितले की, आजपासून बाजारात पापलेटच्या आकाराचा चिलापी मासा अक्षरशः टनाने दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. नाथसागर जलाशयात हा मासा मोठ्या प्रमाणावर सापडतो. परंतु सर्वाधिक पसंती आणि ६५० रुपये किलोचा भाव असलेल्या ‘वाम’ माशांची सध्या टंचाई आहे. राऊ, कटला व मरळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. तर चिंगळ्या प्रजातींची मासळी थोडीफार प्रमाणात आलेली आहे. सुरमई, कटरिना, पाबदा, बांगडा, तारली, पापलेट आणि हलवा या प्रजातीचे मासे मात्र बाजारात दिसून येत नाहीत. याशिवाय झिंगे, बोंबील, सोडा व खेकडे हे जलजीवसुध्दा चवीने खाल्ले जातात.
मृग नक्षत्र हा प्रजनन काळ – मत्स्य अभ्यासक दिलीप भगत
नाथसागर जलाशयात माशांची संख्या घसरणीवर आली असल्याचे वारंवार निष्पन्न झाले आहे. पाणीपातळी घटल्याने मासे कमी झाल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत पक्षीमित्र तथा मत्स्य अभ्यासक दिलीप भगत यांनी गमतीदार माहिती देताना सांगितले की, मृग नक्षत्राचा आणि मासळीचा मोठा संबंध आहे. माशांचा या दिवसापासून म्हणजे ७ जूनपासून प्रजनन काळ सुरू होतो. त्यामुळे जुन्या काळातील मच्छीमार हे जून ते ऑगस्टपर्यंत मासेमारी करणे टाळत असत. उपजिवीकेसाठी नदीकाठी टरबूज, खरबूज, काकडी आणि वांग्याची शेती करत होते.
तसेच मोठे छिद्र असलेल्या जाळ्यांचा वापर करून मासे पकडले जात होते. जेणेकरून माशांची पिल्ले जाळ्यात येणार नाहीत. परंतु आता बदलत्या काळानुसार या नैसर्गिक नियमाला तिलांजली दिली जात आहे. मासे पकडण्यासाठी अक्षरशः मच्छरदाण्या वापरल्या जात आहेत. परिणामी चक्क नवजात पिल्ले जाळ्यात अडकतात. यामुळे अनेक मत्स्य प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तथापि ‘मृग नक्षत्र अथवा ७ जून या दिवशी मासे खाल्ल्यास श्वसनरोग बरा होतो. किंवा वर्षभर तब्येत चांगली राहते. याबाबत नेमके काही सांगता येणार नाही.’ असेही दिलीप भगत यांनी नमूद केले.
दमा अन् श्वास रोग्यांनी दिल्या अॅडव्हान्स ऑर्डर!
७ जून रोजी शहरात वेगवगेळ्या प्रकारच्या माशांची टनाने विक्री होण्याचा संभव आहे. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर प्रत्येक मासे विक्रेत्यांकडे खरेदीसाठी तोबा गर्दी असते. याबाबत मच्छीमार तथा गोदावरी सहकारी संस्थेचे अध्यक्ष रमेश लिंबोरे यांनी सांगितले की, ७ जूनच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे चारपट जास्त मासळी मागवलेली आहे. उद्या सकाळपासून ग्राहकांची झुंबड उडणार आहे. अस्सल मत्स्याहारी खवय्ये तर ‘मृग नक्षत्र’ साग्रसंगीत साजरा करतातच. मात्र चक्क शाकाहारी परंतु दमा किंवा श्वसन संबंधित आजार असलेले रुग्णसुध्दा या मुहूर्तावर मासळीचे सेवन करताना मागेपुढे पाहत नाहीत असेही त्यांनी स्पष्ट केले.
जायकवाडी धरणात कटला जातीचा २० किलो वजनाचा मासा जाळ्यात सापडल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार तथा मच्छीमार समाजाचे कार्यकर्ते भगवान घटे यांनी दिली. शनिवारी पहाटे पाणलोट क्षेत्रातील शेवता गावामध्ये मासेमारी करणारे वाढे यांना त्यांच्या जाळ्यात हा मासा मिळाला. हा मासा अत्यंत चविष्ट असतो. जूनच्या पहिल्या आठवड्यात या माशांच्या पोटात अंडी मोठ्या प्रमाणात असतात. त्या अंड्यांनाही बाजारात सर्वाधिक मागणी असते.



























































