
राज्यात विलंबाने दाखल झालेला मान्सून सुरुवातीच्या दिवसांत धुमशान घालणार आहे. पुढील दोन दिवसांत 25 जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळेल. विजांचा कडकडाट तसेच वादळी वाऱ्यांमुळे काही भागांना पावसाचा जोरदार तडाखा बसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याच अनुषंगाने 25 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करतानाच संपूर्ण राज्याला सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
तळकोकणात शनिवारी मान्सूनचे आगमन झाले. तेथून पुढे वाटचाल करताना राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने महाराष्ट्रासह गुजरात आणि पूर्व राजस्थानला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांसह एकूण 25 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापैकी पुढचे दोन दिवस म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळेल. वादळी वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असेल. त्यात काही ठिकाणी नुकसानीची नोंद होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाच्या हजेरीने हवेत गारवा निर्माण होणार असला तरी वादळी वाऱ्यांच्या हजेरीने राज्यातील नागरिकांची चिंता वाढवली आहे. किनारपट्टी भागातील नागरिकांना अधिक सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मान्सून 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
तळकोकणात दाखल झालेला मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी वेळ लावणार आहे. 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे, असे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहनही केले आहे. राज्याच्या अनेक भागांतील शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनंतर शेतीच्या कामांना गती दिली. त्या शेतकऱ्यांचे मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे डोळे लागले आहेत.
या जिल्ह्यांना अलर्ट
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशीव, बीड, लातूर, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, कोल्हापूर
मुंबईत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार
मुंबईकरांनाही उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील पाच दिवस ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शेजारच्या ठाणे जिह्यात हीच स्थिती राहणार असल्याचे भाकीत केले आहे.




























































