
टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने ठोस पावले उचलली आहेत. त्याला सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. महाराष्ट्राच्या मातृभाषेचा सन्मान राखत अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी भाषा शिकण्याला पसंती दिली आहे. अमराठी चालकांसाठीच्या व्यवहारिक मराठी शिकवणी वर्गांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिवहन विभागाच्या पुढाकारातून आणि कोकण मराठी साहित्य परिषद तसेच मुंबई साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जूनपासून मुंबई महानगर क्षेत्रात अमराठी चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे विशेष वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी तब्बल साडेचार हजारांहून अधिक शिक्षकांची फळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनेक रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी सामाजिक बांधिलकी जपत या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे.





























































