
समृद्धी महामार्गावर आज, सोमवारी (ता. 8) पहाटे दोन वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने झालेल्या या अपघातात शेतकरी रावसाहेब काकड यांचा जागीच मृत्यू झाला, तर विनोद गिरी आणि शरद नाना थोरात हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रावसाहेब काकड, विनोद गिरी आणि शरद नाना थोरात हे तिघे कारने मुंबईहून संगमनेरच्या दिशेने प्रवास करत होते. पहाटेच्या सुमारास इगतपुरी-घोटी दरम्यान त्यांच्या वाहनाचा टायर अचानक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये रावसाहेब काकड यांचा घटनास्थळीच प्राण गेला.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने जखमींना तातडीने घोटी येथील एसएमबीटी (SMBT) रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी विनोद गिरी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. तर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे चुलत बंधू आणि समर्थक शरद नाना थोरात यांना फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे संगमनेर परिसरात आणि काकड कुटुंबावर शोककळा पसरली आहे. संबंधित पोलीस प्रशासनाकडून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.





























































