२० हजार दृष्टिहीनांना मिळणार नवी दृष्टी, उल्हासनगरसह १२ विधानसभा मतदार संघात मोतीबिंदू शस्त्रक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोतीबिंदूचे ऑपरेशन वेळेत न झाल्यास अनेकांना आपली दृष्टी गमवावी लागते. याच जाणिवेतून सामाजिक कार्यकर्ते साकिब गोरे यांनी उल्हासनगरसह १२ विधानसभा मतदार संघात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर भरवण्याचा निर्धार केला असून या मोहिमेला उल्हासनगरातून प्रारंभ केला आहे. त्यामुळे दृष्टिहीनांना नवी दृष्टी मिळणार आहे.

साकिब गोरे हे काही वर्षांपूर्वी कल्याणच्या खाडीजवळ हमालीचे काम करत होते. पुढे त्यांनी याच ठिकाणी रेती व्यवसाय सुरू केला. हे करत असताना त्यांना मोतीबिंदूमुळे शेकडो आदिवासी, गरोरगरीब दृष्टिहीन झाल्याचे त्यांनी पाहिले. हा चटका त्यांच्या जिव्हारी लागला. तेव्हा साकिब गोरे यांनी दृष्टिहीनांना दृष्टी देण्याचा निर्णय घेतला. कुणाकडूनही आर्थिक मदत न घेता साकिब हे स्वतः खर्च करून मोतीबिंदू शिबीर भरवत आहेत.

येथे उपक्रम

उल्हासनगर, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण, अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, मुरबाड, शहापूर अशा १२ विधानसभा मतदार संघात २० हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा आणि चष्मे वाटप करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.