
जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिह्यात हिंदुस्थानी लष्कराचा जवान शहीद झाला आहे. या भागात गेल्या 16 दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन शेरुवाली’ राबवण्यात येत असून या मोहिमेत देशसेवेसाठी लेफ्ट. (कॅप्टन) बीरेश्वर गोस्वामी यांनी प्राणाची आहुती दिली. लेफ्ट. गोस्वामी हे 05 आसाम युनिटमध्ये कार्यरत होते.
प्राप्त माहितीनुसार, राजौरीतील मांजाकोट भगात डोरीमाल-गंभीर मुघलान येथील जंगलात तीन पाकिस्तानी दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर लष्कर व निमलष्करी दलांच्या संयुक्त पथकांकडून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी ले. बीरेश्वर गोस्वामी हे एका अरुंद डोंगराळ भागात त्यांच्या टीमसह शोधमोहीम राबवत होते. अचानक ले. गोस्वामी यांचा पाय घसरला आणि ते खोल दरीत कोसळले. त्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. उचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ले. गोस्वामी यांचे पार्थिव आज सकाळी जम्मू येथील हवाई तळावर आणण्यात आले. तेथे त्यांना लष्करी इतमामात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले.



























































