
कोकणातील प्रमुख घाटांपैकी दुवा मानला जाणाऱ्या भुईबावडा घाटासाठीच यंदा ‘दुवा’ मागण्याची वेळ आली आहे. घाटातील संरक्षण भिंती, संरक्षण कठडे यासह कधीही धोकादायक दरडी कोसळण्याची दाट संभावना आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग घाटमार्गाच्या देखभाल दुरुस्ती करण्याऐवजी पडलेल्या दरडी हटविण्यातच धन्यता मानत आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातील भुईबावडा, करुळ, आंबोली व फोंडाघाट या प्रमुख घाटमार्गांपैकी भुईबावडा व करुळ हे दोन घाटमार्ग पावसाळ्यात धोकादायक बनतात. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारे महत्त्वपूर्ण घाटमार्ग म्हणून या मार्गांची ओळख आहे. पावसाळा सुरू झाला की, भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याच्या मालिका सुरू होतात.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अनेकदा घाटरस्त्यांवर मोठमोठ्या दरडी, दगड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकार घडले. त्यामुळे कोकणाला जोडणारे हे दोन्ही घाटमार्ग वाहनचालकांसाठी धोकादायक ठरतात. गतवर्षी भुईबावडा घाटात संरक्षण भिंती बांधल्या आहेत, परंतु ज्या ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या ठिकाणी कोणतीच उपाययोजना केली गेली नाही.
दरवर्षी पावसाळा आला की, भुईबावडा व करुळ घाटांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर येतो. विशेषतः भुईबावडा घाटाच्या पुनर्बांधणीसाठी भरीव निधीची आवश्यकता आहे. दोन्हीही घाटात धोकादायक वळणे आहेत. ठिकठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर पाणी येणे त्याचबरोबर संरक्षण भिंती, संरक्षण कठडेदेखील ढासळले आहेत. धोकादायक वळणे जेसीबी व पोकलॅनच्या साहाय्याने हटविणे गरजेचे आहे.





























































