पाऊस आणि वादळाचा एअर इंडियाला फटका, दिल्ली विमानतळावर तीन विमानांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि पावसाचा एअर इंडियाला फटका बसला आहे. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वर उभी असलेली एअर इंडियाची तीन विमाने वादळ आणि पावसामुळे क्षतिग्रस्त झाली. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डीजीसीए या अपघाताची सखोल चौकशी करत आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना शनिवारी घडली असून, तिन्ही विमाने सेवेतून तात्पुरती बाजूला करण्यात आली, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विमानतळावर उभ्या असलेल्या एअर इंडियाच्या तीन सिंगल-इंजिन विमानांना उपकरणांची धडक बसली. या धडकेत तिन्ही विमानांचे नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले.

हवामानातील बदलाबाबत एअर ट्रॅफिक कंट्रोलने (ATC) कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती, असेही खासगी ऑपरेटरने सांगितले. मात्र, खराब हवामानाचा फटका एअर इंडियाच्या तीन विमानांशिवाय इतर कंपन्यांच्या विमानांनाही बसला, असे एअरलाईन्सच्या एका सूत्राने सांगितले. बाधित झालेल्या तीन विमानांपैकी दोन विमाने लवकरच पुन्हा सेवेत दाखल होतील, तर तिसऱ्या विमानाची दुरुस्ती पूर्ण होण्यास थोडा अधिक वेळ लागेल, असेही त्यांनी नमूद केले.