
आतापर्यंत पक्षात जे घडलं त्याबाबत प्रत्येकवेळी मी सर्वांना समजून आणि सावरून घेतलं. कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप असेल तर नक्की विचार केला जाईल. दादा ज्या प्रमाणे पक्षहितासाठी कठोर निर्णय घेत, तसेच निर्णय घेतले जातील, असे सांगत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षांतर्गत धुसफुस सहन केली जाणार नाही असा सूचक इशारा संबंधितांना दिला.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत आज पार पडला. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सुनेत्रा पवार यांनी न्यायासाठी अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आपण पुढे जाणार असल्याचे सांगत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे पक्षहिताच्या निर्णयामध्ये माझी साथ देतील. पक्षाची होणारी बदनामी माझ्यासह आपल्या सर्वांचीच आहे. मला या संदर्भामध्ये कठोर भूमिका घेण्याची वेळ येणार नाही याची सर्वांनीच खबरदारी घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
अजितदादांनी त्यांच्या हयातीत कार्यकर्त्यांना समजून घेतलं, त्यांचा हट्ट पुरवला. त्यांना मान सन्मान दिला, पदं दिली. जे काही मागितलं ते देण्याचा प्रयत्न केला. यापुढे पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
प्रत्येक कार्यकर्त्याची निष्ठा, काम आणि समर्पण माझ्या लक्षात आहे. योग्य वेळी त्याला न्याय आणि संधी मिळणार.
लवकरच विविध महामंडळांच्या नियुक्त्या केल्या जातील. पक्ष निष्ठा आणि समर्पण या निकषावर हे निर्णय घेतले जातील.
पक्षासाठी किती वर्षे काम केलं यापेक्षा पक्षाला किती पुढे नेलं जाईल याचा विचार केला जाईल.
बाहेरून आलेल्या नेत्यांचा सन्मान राखण्यासाठी काही तडजोडी केल्या जातील, पण कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही.
भुजबळ कबड्डीचे उत्तम खेळाडू – तटकरे
भुजबळ हे उत्तम कबड्डीपटू आहेत, खोलवर चढाई कशी करायची हे त्यांना चांगलंच माहिती आहे. कधी ते बोनस गुण घेऊन येतील तर कधी समोरच्यांचे सातही जण घेऊन येतील असा टोला सुनील तटकरे यांनी लगावला प्रफुल पटेल फुटबॉलपटू तर हसन मुश्रीफ कुस्तीपटू आहेत. ही सर्व तगडी टीम अजित दादांनी तयार केली असून, आम्ही हा संघ नक्की यशस्वी करू, असे तटकरे म्हणाले.
राजकारणाचा खेळ करू नका – भुजबळ
तटकरे यांनी भुजबळांचा कबड्डीपटू म्हणून उल्लेख केला होता. त्यावर बोलतान छगन भुजबळ यांनी खेळात राजकारण आणू नका, राजकारणाचा खेळ करू नका, असा टोला लगावला. पक्षापेक्षा कुणी मोठं नाही. पक्ष म्हणजे फक्त झेंडा नाही तर तो कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे. त्यामुळे पक्ष आपल्याला मोठा करायचा आहे. पदं म्हणजे अळवावरचं पाणी, कधी निसटून जाईल हे सांगता येत नाही, असे भुजबळ म्हणाले.


























































