‘एसआयआर’च्या कामाला गैरहजर ‘बीएलओ’विरोधात गुन्हा दाखल करा, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे सक्त निर्देश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रमअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरात कार्यवाही सुरू आहे. तथापि, या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) वारंवार सूचना देऊनही अद्याप रुजू झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुजू न झालेल्या बीएलओवर संबंधित कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे निर्देश सर्व अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आज दिले.

मुंबई शहर आणि उपनगरे मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात आज बैठक पार पडली. यावेळी 13 आणि 14 जून रोजी बीएलओंचे प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचना पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी विपीन शर्मा यांच्यांकडून देण्यात आले. एसआयआर कार्यक्रमात मॅपिंग, तार्किक विसंगती आणि बीएलओंची अनुपस्थिती हे अत्यंत संवेदनशील विषय आहेत. या कामात कोणतीही दिरंगाई होऊ नये, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, मुंबई उपनगर जिल्हा जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल उपस्थित होते.

पालिकेचे 7 हजार 300 कर्मचारी नियुक्त

‘एसआयआर’ कार्यक्रमासाठी मुंबई महानगरपालिकेकडून 7 हजार 300 कर्मचारी बीएलओ म्हणून नेमले आहेत. तसेच सुमारे 1 हजार अतिरिक्त कर्मचारीही दिले आहेत. यासोबतच वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभाग, आयकर विभाग, मुंबई विद्यापीठ, खासगी विनाअनुदानित शाळेचे शिक्षक आणि राज्य शासनाच्या विविध विभागांतील कर्मचारीही नेमण्यात आले आहेत.