पाणीटंचाईच्या झळा – कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने पाणीबाणी, १२ ते २१ जूनदरम्यान पाणी कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारवी धरणात अवघा २७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीटंचाईच्या मोठ्या झळा बसू लागल्या आहेत. अंबरनाथ-बदलापूरनंतर आता कल्याण-डोंबिवलीतही पाण्याचे रेशनिंग करावे लागणार आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत म्हणजेच १२ ते २१ जूनदरम्यान शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.

हवामान खात्याने यंदा पाऊस लांबण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्राधिकरणांना दररोज २० टक्के पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बारवे, मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रांतून होणारा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

पाणी जपून वापरा

मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शाहाड, अटाळी आणि इतर गावांबरोबरच योगीधाम, मिलिंदनगर, बिर्ला कॉलेज परिसर, चिकनघर, मुरबाड रोड आणि वालधुनी येथील पाणीपुरवठा १६ व २१ जून रोजी २४ तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

डोंबिवली पूर्वेतील ‘फ’ आणि ‘ग’ प्रभाग क्षेत्रांतील पाणीपुरवठा १२ आणि १७ जून रोजी बंद राहणार आहे.
डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागाचा पाणीपुरवठा १४ व १९ जून रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.
कल्याण पूर्वेतील ‘ड’ व ‘इ’ प्रभागांसह कल्याण पश्चिमेतील गोविंद हिल, पारनाका आणि सुभाष मैदान टाकी परिसराला १३ व १८ जून रोजी पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.
कल्याणमधील ‘ब’ आणि ‘क’ प्रभाग क्षेत्रांना १५ व २० जून रोजी पाणी बंद राहील.